• Tue. Aug 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

नगर तालुका तालीम सेवा संघाच्या नवीन कार्यकारिणीला धर्मादाय उपायुक्तांची मान्यता

ByMirror

Aug 25, 2026
राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू घडविण्याचा निर्धार; पैलवान नाना डोंगरे यांचा पुढाकार

पै. नाना डोंगरे पुन्हा पाच वर्षांसाठी अध्यक्षपदी निवड


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुका तालीम सेवा संघाच्या नवीन कार्यकारिणीला धर्मादाय उपायुक्तांची मान्यता मिळाली आहे. संघाच्या कार्यकारिणीची मुदत संपल्यानंतर अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी धर्मादाय उपायुक्तांकडे चेंज रिपोर्ट दाखल केला होता. या चेंज रिपोर्टला मंजुरी मिळाल्याने संघाच्या नवीन कार्यकारिणीचा मार्ग मोकळा झाला असून, पै. नाना डोंगरे यांची पुन्हा पाच वर्षांसाठी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.


नगर तालुका तालीम सेवा संघाची सन 2024 मध्ये पाच वर्षांच्या कालावधीसाठी कार्यकारिणीची मुदत संपली होती. सदर कार्यकारिणीची मुदत पूर्ण झाल्यानंतर संघाच्या प्रशासकीय कामकाजाबाबत आवश्‍यक असलेला चेंज रिपोर्ट धर्मादाय उपायुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. या अहवालाची प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन कार्यकारिणीला अधिकृत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे संघाच्या आगामी कार्याला संस्थात्मक आणि कायदेशीर स्वरूपात महत्त्व प्राप्त झाले आहे.


नवीन कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी प्रतिभा डोंगरे, उपाध्यक्षपदी काशीनाथ पळसकर व संदिप डोंगरे, सचिवपदी बाळू भापकर, सहसचिवपदी प्रियंका डोंगरे, खजिनदारपदी किसन वाबळे, तर विश्‍वस्तपदी उत्तम कांडेकर यांची निवड करण्यात आली आहे. अनुभवी पदाधिकाऱ्यांसह नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून संघाचे काम अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


नगर तालुका तालीम सेवा संघाच्या माध्यमातून तालुक्यातील कुस्ती क्षेत्राला सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. संघाच्या वतीने विविध कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले जाते. तसेच विविध स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड चाचणी घेऊन गुणवंत मल्लांची निवड केली जाते आणि त्यांना पुढील स्तरावरील स्पर्धांसाठी संघाच्या माध्यमातून पाठविले जाते. ग्रामीण भागातील तसेच नवोदित कुस्तीपटूंना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या खेळातील कौशल्याला चालना देणे आणि त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे, यासाठी संघाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. तालीम संस्कृती आणि कुस्तीची परंपरा जपतानाच नव्या पिढीतील मल्ल घडविण्यावर संघाचा भर राहिला आहे.


कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला पारंपरिक खेळ असून, ग्रामीण भागातील अनेक गुणवान खेळाडूंमध्ये मोठी क्षमता आहे. मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन, स्पर्धेचा अनुभव आणि प्रोत्साहन मिळणे आवश्‍यक असते. ही गरज लक्षात घेऊन नगर तालुका तालीम सेवा संघाच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे. नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *