• Sun. Aug 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयात विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात

ByMirror

Aug 23, 2026
विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी केले वृक्षारोपण; विजेत्यांना शालेय साहित्याचे बक्षीस

विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी केले वृक्षारोपण; विजेत्यांना शालेय साहित्याचे बक्षीस


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवनाथ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे विविध उपक्रम उत्साहात पार पडले. यामध्ये विविध वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला. स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्यरूपी बक्षिसांचे वाटप करण्यात आले.


या कार्यक्रमास मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, आप्पासाहेब कदम, शरद भोस, तेजस केदारी, प्रमोद थिटे, तुकाराम पवार, मंदा साळवे, स्वाती इथापे, मोहिनी धर्माधिकारी, रेखा जरे, पल्लवी खरात, सुप्रिया ठुबे, दिपाली म्हस्के, रत्नमाला थोरात, मयुरी जाधव, निकिता रासकर, प्रशांत जाधव, लहानू जाधव आदी उपस्थित होते.
विद्यालयात आयोजित विविध वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळण्याबरोबरच त्यांच्यामध्ये शिस्त, आत्मविश्‍वास, चिकाटी आणि संघभावना विकसित झाली. स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विजेत्यांना शालेय साहित्यरूपी बक्षिसे देण्यात आली. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन करून भविष्यातही विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिले.


क्रीडा स्पर्धांसोबतच विद्यालय परिसरात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी वृक्षारोपण केले. वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी केवळ झाडे लावण्यापुरते मर्यादित न राहता त्यांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संदेश देण्यात आला. शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयीची जबाबदारी निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी आपल्या भाषणात नवनाथ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, “नवनाथ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी गावातील शाळांचा कायापालट केला आहे. शिक्षणासाठी विशेष योगदान व प्रोत्साहन देऊन त्यांनी शाळांच्या इमारती बांधून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. शिक्षण क्षेत्राबरोबरच गावाच्या सर्वांगीण विकासासाठीही त्यांचे मोठे योगदान आहे.”


गावातील विविध प्रभावी विकासकामांमध्ये राजेंद्र शिंदे यांचे योगदान राहिले आहे. मंदिरांचे जीर्णोद्धार, रस्त्यांची कामे तसेच पर्यावरण संवर्धनासाठी विशेष कार्य करत त्यांनी रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण केले आहे. गावातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन रुग्णवाहिका व शववाहिकेची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. गावाच्या विकासात्मक वाटचालीत त्यांचे सातत्याने योगदान मिळत असल्याचे पै. नाना डोंगरे यांनी सांगितले.


मुख्याध्यापक उत्तम कांडेकर म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि पर्यावरण संवर्धनाला महत्त्व देणे गरजेचे आहे. विविध क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास, शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण निर्माण होतात. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत विजय मिळविण्याबरोबरच पराभवातूनही शिकण्याची वृत्ती ठेवावी. शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध गुणांना वाव देण्यासाठी सातत्याने उपक्रम राबविण्यात येतील. “वृक्ष हे पर्यावरणाचे आधारस्तंभ आहेत. विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणासोबतच लावलेल्या झाडांची नियमित काळजी घेतली, तर पर्यावरण संवर्धनाची ही चळवळ अधिक प्रभावी होईल. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एका झाडाची जबाबदारी स्वीकारण्याचे त्यांनी आवाहन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *