• Sun. Aug 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

फिरोदिया शिवाजियन्सच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी रंगल्या चुरशीच्या लढती

ByMirror

Aug 23, 2026
आर्मी, आयकॉन आणि श्रीसाई संघांचा दमदार विजय

आर्मी, आयकॉन आणि श्रीसाई संघांचा दमदार विजय


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी (दि. 21 ऑगस्ट) अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉलचा थरार अनुभवायला मिळाला. स्पर्धेतील 16 वर्षांखालील मुली तसेच 12 व 14 वर्षांखालील मुलांच्या गटातील तिसऱ्या क्रमांकासाठीचे सामने अत्यंत चुरशीचे झाले. विशेष म्हणजे 12 व 14 वर्षांखालील मुलांच्या गटातील दोन्ही सामने निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरीत राहिल्याने टायब्रेकरचा आधार घ्यावा लागला. यामध्ये आर्मी पब्लिक स्कूल आणि आयकॉन पब्लिक स्कूलने बाजी मारत स्पर्धेत तिसरे स्थान निश्‍चित केले. तर 16 वर्षांखालील मुलींच्या गटात श्रीसाई इंग्लिश मीडियम स्कूलने पोदार इंटरनॅशनल स्कूलवर 1-0 असा विजय मिळवत तिसऱ्या स्थानावर आपले नाव कोरले. दरम्यान, शनिवारी (दि. 22 ऑगस्ट) विविध गटांच्या अंतिम सामन्यांचा थरार रंगणार असून, विजेतेपदासाठी खेळाडूंमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळणार आहे.


14 वर्षांखालील मुलांच्या गटातील तिसऱ्या स्थानासाठी आठरे पाटील पब्लिक स्कूल आणि आर्मी पब्लिक स्कूल यांच्यात रंगलेला सामना सुरुवातीपासूनच उत्कंठावर्धक ठरला. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने एकमेकांच्या गोलपोस्टवर आक्रमणे करत असतानाही बचावफळीने भक्कम कामगिरी केल्याने निर्धारित वेळेत एकाही संघाला गोल करता आला नाही. संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी आक्रमक खेळ केला. मात्र, शेवटपर्यंत गोल न झाल्याने सामना 0-0 असा बरोबरीत राहिला. त्यामुळे निकालासाठी टायब्रेकरचा आधार घेण्यात आला. टायब्रेकरमध्ये आर्मी पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी संयमी आणि अचूक खेळ करत 4-3 गोलने विजय मिळविला. आर्मी पब्लिक स्कूलकडून रोहित, सार्इ खाडे, प्रथम आणि विजय यांनी टायब्रेकरमध्ये गोल नोंदवत संघाला विजय मिळवून दिला. तर आठरे पाटील पब्लिक स्कूलकडून वेदांत, आयुष आणि सार्इ धामणे यांनी गोल केले. अखेर आर्मी पब्लिक स्कूलने 4-3 अशा फरकाने विजय मिळवत तिसरे स्थान पटकावले.


12 वर्षांखालील मुलांच्या गटात प्रवरा पब्लिक स्कूल आणि आयकॉन पब्लिक स्कूल यांच्यातील सामना देखील अत्यंत चुरशीचा झाला. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी मैदानावर आक्रमक आणि वेगवान खेळाचे प्रदर्शन केले. मात्र, प्रतिस्पर्धी संघाच्या बचावफळीला भेदण्यात दोन्ही संघांना अपयश आल्याने निर्धारित वेळेत एकही गोल झाला नाही. सामना अखेरपर्यंत 0-0 गोलने बरोबरीत राहिल्यानंतर टायब्रेकरमध्ये निकाल लावण्यात आला. टायब्रेकरमध्ये प्रवरा पब्लिक स्कूलकडून प्रिन्स याने 1 गोल केला. तर आयकॉन पब्लिक स्कूलकडून आरव बजाज आणि पर्व लोढा यांनी प्रत्येकी 1 गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. अखेर आयकॉन पब्लिक स्कूलने 2-1 गोलने विजय मिळवत तिसरे स्थान निश्‍चित केले. निर्णायक क्षणी खेळाडूंनी दाखविलेली अचूकता आणि आत्मविश्‍वास संघाच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरला.


16 वर्षांखालील मुलींच्या गटात श्रीसाई इंग्लिश मीडियम स्कूल आणि पोदार इंटरनॅशनल स्कूल यांच्यात तिसऱ्या स्थानासाठी सामना झाला. या सामन्यात सुरुवातीपासूनच दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. मात्र, श्रीसाई इंग्लिश मीडियम स्कूलच्या ह्रद्या तडके हिने सामन्याच्या 27 व्या मिनिटाला अचूक गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. गोल झाल्यानंतर पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी बरोबरी साधण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, श्रीसाईच्या बचावफळीने उत्कृष्ट कामगिरी करत पोदार स्कूलला एकही गोल करण्याची संधी दिली नाही. अखेर सामन्याच्या शेवटपर्यंत श्रीसाई इंग्लिश मीडियम स्कूलने आपली 1-0 अशी आघाडी कायम राखली आणि विजय मिळवत तिसरे स्थान पटकावले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *