• Fri. Aug 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

गणेशोत्सवापूर्वी शिक्षक-शिक्षकेतरांचे ऑगस्टचे वेतन 1 सप्टेंबरला द्या

ByMirror

Aug 20, 2026

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांच्याकडे मागणी; शालार्थमुळे रखडलेले वेतनही तातडीने अदा करा


गणेशोत्सवापूर्वी वेळेत वेतन मिळाल्यास राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार -बाबासाहेब बोडखे


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माहे ऑगस्ट 2026 चे नियमित वेतन गणेशोत्सवापूर्वी 1 सप्टेंबर 2026 रोजी अदा करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर तसेच शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांना दिली असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.


यंदा गणेशोत्सवाला 14 सप्टेंबर 2026 पासून सुरुवात होत असून महाराष्ट्राचे दैवत आणि विद्येची देवता असलेल्या श्री गणरायाचा उत्सव राज्यभर मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला जातो. गणेशोत्सवाला राज्य शासनाने राज्योत्सवाचा दर्जा दिल्याने या उत्सवाचे महत्त्व आणखी वाढले आहे. या पार्श्‍वभूमीवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उत्सवापूर्वी नियमित वेतन मिळणे आवश्‍यक असून, त्यासाठी ऑगस्ट महिन्याचे वेतन 1 सप्टेंबर रोजीच देण्यात यावे, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.
राज्यातील अनुदानित तसेच अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन शालार्थ वेतन प्रणालीद्वारे अदा केले जाते. मात्र, या प्रणालीशी संबंधित विविध प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेल्या नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे. तसेच शालार्थ प्रणालीमध्ये पदनिर्मितीची अनेक प्रकरणे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. शालार्थ आयडी मिळण्याची प्रकरणेदेखील अद्याप निकाली निघालेली नसल्याचे शिक्षक परिषदेने निवेदनात नमूद केले आहे.


या प्रशासकीय प्रक्रियांमुळे राज्यातील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मागील चार ते पाच महिन्यांपासून नियमित वेतनापासून वंचित असल्याचा दावा शिक्षक परिषदेने केला आहे. वेतन हा कर्मचाऱ्यांचा मूलभूत हक्क असून, सलग अनेक महिन्यांचे वेतन थकीत राहणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या थकीत वेतनासह ऑगस्ट 2026 चे वेतनही वेळेत देण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घेण्याची आवश्‍यकता असल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले.
शालार्थ प्रणालीतील पदनिर्मिती, शालार्थ आयडी किंवा ई-केवायसीची प्रक्रिया प्रलंबित असल्यामुळे संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1 सप्टेंबर रोजी देण्यात येणाऱ्या वेतनापासून वंचित ठेवू नये, अशी विशेष मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजा वाढतात. घरगुती खर्च, गणेशमूर्ती, पूजासाहित्य, सणासुदीची खरेदी तसेच इतर आवश्‍यक खर्चासाठी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचे वेतन नेहमीच्या प्रक्रियेनुसार 1 सप्टेंबर रोजी अदा करण्याचे स्पष्ट आदेश शासनाने संबंधित विभागांना द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.


तसेच गेल्या काही महिन्यांपासून वेतन न मिळालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तातडीने अदा करण्यासाठी स्वतंत्र कार्यवाही करावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गणेशोत्सवापूर्वी राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी शासनाने विलंब न करता आदेश निर्गमित करावेत. 1 सप्टेंबर 2026 रोजी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन त्यांच्या खात्यावर जमा होईल, याची खात्री करण्यासाठी शिक्षण विभागाने आवश्‍यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. गणेशोत्सवापूर्वी वेळेत वेतन मिळाल्यास राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, शासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, असे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी सांगितले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *