• Fri. Aug 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

‘इंडिया अगेंस्ट कुमन धारणालय’ अभियानाची 28 ऑगस्टला घोषणा

ByMirror

Aug 20, 2026
पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेचा पुढाकार

जातीय विषमता, धार्मिक द्वेष आणि हिंसक प्रवृत्ती रोखण्यासाठी वैचारिक चळवळ


पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेचा पुढाकार


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजातील स्वार्थ, जातीय विषमता, धार्मिक द्वेष आणि हिंसक प्रवृत्तींना वैचारिक पातळीवर आव्हान देण्यासाठी ‘इंडिया अगेंस्ट कुमन धारणालय’ या देशव्यापी मोहिमेची घोषणा शुक्रवार, दि. 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार आहे.


पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट व्यक्तीविरोध नसून, समाजात खोलवर रुजलेल्या विघातक मानसिक प्रवृत्तींना वैचारिक आव्हान देऊन त्यामध्ये परिवर्तन घडविणे हे आहे. आयोजकांच्या मते, ‘कुमन’ हा शब्द कोणत्याही धर्म, जात किंवा समुदायाविरुद्ध नसून तीन प्रकारच्या विघातक मनोवृत्तींचे प्रतीक आहे. यामध्ये ‘कु’ म्हणजे कुरु, कौरव,स्वार्थी प्रवृत्ती सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा केवळ स्वतःकडे किंवा संकुचित गटाकडे केंद्रित करण्याची मानसिकता; ‘म’ म्हणजे मनुवादी प्रवृत्ती जन्माच्या आधारावर उच्च-नीच सामाजिक व्यवस्था आणि विषमता टिकवून ठेवण्याची मानसिकता; तर ‘न’ म्हणजे नथूराम,द्वेषमूलक व हिंसक प्रवृत्ती संवाद, लोकशाही आणि अहिंसेऐवजी द्वेष व हिंसेकडे झुकणारी मानसिकता, अशी मांडणी करण्यात आली आहे.


या आंदोलनात ‘धारणालय’ हा शब्द व्यक्तीच्या मनात दीर्घकाळ साठलेल्या संस्कार, अनुभव, श्रद्धा, पूर्वग्रह आणि सामाजिक धारणा यांच्या संचयासाठी वापरण्यात आला आहे. त्यातील विघातक धारणा ओळखून त्यांचे विवेकपूर्ण परीक्षण व परिवर्तन करण्यासाठी ‘ओळखा तपासा बदला’ ही त्रिसूत्री मोहिमेत मांडण्यात येणार आहे.
याला सकारात्मक पर्याय म्हणून ‘पसायदान धारणालय’ ही संकल्पना पुढे करण्यात आली आहे. समता, बंधुता, अहिंसा, लोकभक्ती, ज्ञानभक्ती, कर्मभक्ती, संविधानिक नैतिकता, निसर्गप्रेम आणि कायद्याचे राज्य या मूल्यांवर आधारित वैयक्तिक व सामूहिक परिवर्तन घडविणे, हा त्यामागील उद्देश आहे. निर्णय प्रक्रियेत तर्क, विवेक, उपलब्ध माहिती आणि परिणामांची जाणीव यांना प्राधान्य देण्याच्या संकल्पनेला रिकॉन्शिओ विवेकशासन असे संबोधण्यात आले आहे.


पीपल्स हेल्पलाईनचे विधिज्ञ ॲड. कारभारी गवळी म्हणाले की, “शासन किंवा व्यवस्था बदलणे महत्त्वाचे आहे; परंतु माणसाच्या मनातील स्वार्थ, विषमता आणि द्वेषमूलक धारणा बदलल्या नाहीत, तर परिवर्तनाचे परिणाम दीर्घकाळ टिकणार नाहीत. द्वेषाऐवजी विवेक आणि विषमतेऐवजी संविधानिक समता प्रस्थापित करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.”
या वैचारिक मोहिमेत नागरिक, युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंतांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आले आहे. 28 ऑगस्टच्या कार्यक्रमात या देशव्यापी मोहिमेची पुढील रणनीती आणि जनसंकल्प जाहीर करण्यात येणार आहे. चळवळीसाठी अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, राहुल आढाव, बाळासाहेब पालवे, आनंद आढाव, अशोक भोसले, पोपट भोसले, वीर बहादुर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, अभिमान शिंदे, बाबासाहेब भोसले, अमित थोरात आदी प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *