• Wed. Aug 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

जात, हुंडा, कर्ज अन् दिखाऊपणाला लग्नातून हद्दपार करण्याचा निर्धार!

ByMirror

Aug 18, 2026
जात, हुंडा, कर्ज अन् दिखाऊपणाला लग्नातून हद्दपार करण्याचा निर्धार!

‘तिरंगा धारणालय विवाह’चा नवा संकल्प; जातमुक्त, हुंडामुक्त विवाहसंस्कृतीचा एल्गार


२८ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संविधानाधिष्ठित विवाहव्यवस्थेची सार्वजनिक घोषणा


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जातव्यवस्था, हुंडापद्धती, अवाढव्य विवाहखर्च, विवाहासाठी घेतले जाणारे कर्ज, दिखाऊ प्रतिष्ठा आणि प्रदूषणकारी सोहळे विवाहसंस्थेतून हद्दपार करून समानता, विवेक, संविधानिक नैतिकता आणि उन्नत चेतनेवर आधारित ‘तिरंगा धारणालय विवाह’ व्यवस्था सुरू करण्याचा प्रस्ताव पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेने जाहीर केला आहे.
या नव्या संविधानाधिष्ठित विवाहसंकल्पनेची सार्वजनिक घोषणा शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार असल्याची माहिती पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.


‘तिरंगा धारणालय विवाह’ हा स्वतंत्र विवाहकायदा किंवा कोणताही धार्मिक पंथ नसून, कायदेशीरदृष्ट्या पात्र असलेल्या दोन प्रौढ व्यक्तींनी स्वेच्छेने स्वीकारावयाची ऐच्छिक संविधानाधिष्ठित विवाह-सनद असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. विवाहाची कायदेशीर नोंदणी लागू कायद्यांनुसारच केली जाईल. मात्र, जीवनसाथीची निवड जन्माची जात, उपजात, हुंडा, संपत्ती किंवा सामाजिक प्रतिष्ठेच्या निकषांवर न करता व्यक्तीची वैचारिक पात्रता, परस्पर सन्मान, लोकभक्ती, ज्ञानभक्ती, कर्मभक्ती, संविधानिक नैतिकता आणि कायद्याच्या राज्यावरील विश्वास या मूल्यांच्या आधारे व्हावी, हा या संकल्पनेचा मुख्य उद्देश आहे.
या विवाहव्यवस्थेत तिरंग्याच्या तीन रंगांना मूल्यात्मक अर्थ देण्यात आला आहे. भगवा रंग लोकभक्तीचा, पांढरा रंग ज्ञानभक्तीचा आणि हिरवा रंग कर्मभक्तीचा, तर अशोकचक्र संविधानिक नैतिकता आणि कायद्याच्या राज्याचे प्रतीक मानण्यात आले आहे. या मूल्यांवर आधारित सहजीवनातून पती-पत्नीमध्ये परस्पर विश्वास, समानता, सुरक्षितता आणि उन्नत आनंद निर्माण व्हावा, अशी संकल्पना मांडण्यात आली आहे.


जन्माची जात ही जीवनसाथीच्या निवडीची अट असू नये, अशी स्पष्ट भूमिका या प्रस्तावातून मांडण्यात आली आहे. जात, उपजात, वर्ण, हुंडा किंवा तथाकथित कौटुंबिक प्रतिष्ठेच्या नावाखाली कायदेशीर वय पूर्ण केलेल्या प्रौढ व्यक्तींच्या स्वेच्छेवर दबाव आणण्यास स्पष्ट विरोध करण्यात आला आहे. हुंडा देणे, घेणे अथवा त्याची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मागणी करणे पूर्णतः निषिद्ध मानण्याचा संकल्पही करण्यात आला आहे.


विवाहसमारंभात मोजके नातेवाईक आणि जवळचे मित्र यांनाच सहभागी करून भव्य मंडप, अवाजवी सजावट, महागड्या भेटवस्तू, भोजनातील उधळपट्टी आणि प्रतिष्ठेच्या प्रदर्शनावर होणारा खर्च टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विवाहामुळे कोणत्याही कुटुंबावर कर्जाचा बोजा पडू नये; उलट वाचविलेला पैसा नवदाम्पत्याचे शिक्षण, निवास, आरोग्य, व्यवसाय किंवा सुरक्षित भवितव्य यांसाठी वापरला जावा, अशी भूमिका या संकल्पनेत मांडण्यात आली आहे.


कायद्यानुसार पुनर्विवाहास पात्र असलेल्या घटस्फोटित व्यक्ती, विधवा आणि विधुर यांच्या विवाहाकडे सामाजिक कलंक म्हणून पाहिले जाऊ नये, असेही या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. पूर्वीच्या विवाहाची, अपत्यांची तसेच महत्त्वाच्या कौटुंबिक आणि आर्थिक जबाबदाऱ्यांची माहिती दोन्ही व्यक्तींनी एकमेकांना प्रामाणिकपणे द्यावी आणि परस्पर संमतीने व समान प्रतिष्ठेने विवाहाचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


विवाहसोहळ्याच्या नावाखाली होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी डीजे, कर्णकर्कश ध्वनिक्षेपक, बँड-बाजा, फटाके, प्रदूषणकारी मिरवणुका आणि अनावश्यक वाहनताफे टाळण्याचा संकल्प करण्यात आला आहे. प्लास्टिकचा वापर, अन्नाची नासाडी आणि पर्यावरणाला हानी पोहोचविणारा दिखावा टाळून विवाहसोहळा ध्वनिप्रदूषणमुक्त, वायुप्रदूषणमुक्त आणि निसर्गस्नेही करण्यावर भर दिला जाणार आहे.


पती-पत्नीच्या नात्यात लैंगिक समानता, व्यक्तिसन्मान, आर्थिक पारदर्शकता, घरकामातील समान सहभाग आणि परस्पर सुरक्षितता या बाबींना महत्त्व दिले जाणार आहे. मतभेद निर्माण झाल्यास हिंसा, अपमान, जातीय दबाव किंवा कौटुंबिक दहशतीऐवजी संवाद, समुपदेशन आणि कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याची भूमिका घेण्यात आली आहे.
“लग्नात जन्माची जात नव्हे, तर जगण्याची पात्रता पाहिली पाहिजे; संपत्तीचा हुंडा नव्हे, तर विचारांचा तिरंगा पाहिला पाहिजे. विवाहाचा उद्देश प्रतिष्ठेचे प्रदर्शन, उधळपट्टी किंवा कर्जबाजारीपणा नसून, दोन समान व्यक्तींना चेतनाशासनातून उन्नत आनंद देणारे संविधानाधिष्ठित सहजीवन निर्माण करणे हा असला पाहिजे,” असे ॲड. कारभारी गवळी यांनी स्पष्ट केले.
या लोकचळवळीसाठी अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, राहुल आढाव, बाळासाहेब पालवे, आनंद आढाव, अशोक भोसले, पोपट भोसले, वीर बहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, अभिमान शिंदे, बाबासाहेब भोसले, अमित थोरात आदी प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *