• Wed. Aug 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

संत सावता महाराजांनी कर्मालाच ईश्‍वरसेवेचे माध्यम बनवले -उपमहापौर ॲड. धनंजय जाधव

ByMirror

Aug 11, 2026
72 रुग्णांवर पुण्यात होणार मोफत शस्त्रक्रिया

फिनिक्स सोशल फाऊंडेशनतर्फे 325 रुग्णांची नेत्रतपासणी; संत सावता महाराज पुण्यतिथीचा उपक्रम


72 रुग्णांवर पुण्यात होणार मोफत शस्त्रक्रिया


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- संत सावता महाराजांनी कर्मालाच ईश्‍वरसेवेचे माध्यम मानून समाजाला माणुसकी, श्रमप्रतिष्ठा आणि भक्तीचा संदेश दिला. याच विचारांचा वारसा पुढे नेत फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे हे धर्म, जात-पंथाचा भेद न करता गोरगरीब व गरजू नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना दृष्टी मिळवून देण्याचे तसेच नेत्रदान व अवयवदानाबाबत जनजागृती करण्याचे त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांनी केले.


संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने सोमवारी (दि. 10 एप्रिल) नागरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिरात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उपमहापौर ॲड. धनंजय जाधव बोलत होते. यावेळी ग्रामविस्तार अधिकारी नेताजी भाबड, फिनिक्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, ग्रामपंचायत सदस्य मयुर पाखरे, युवा नेते यशवंत पानमळकर, संजय ताजणे, राजेंद्र बोरुडे, ह.भ.प. मोहनीराज कुऱ्हे, भानुदास खरपुडे, युवा नेते सोमनाथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


पुढे बोलताना ॲड. धनंजय जाधव म्हणाले की, संत सावता महाराज हे वारकरी संप्रदायातील महान संत होते. त्यांनी भक्तीबरोबरच कर्माला आणि कर्तव्याला सर्वोच्च स्थान दिले. शेतीचे काम करत असतानाच त्यांनी विठ्ठलाची भक्ती केली. त्यामुळे त्यांच्या जीवनातून ‘काम हेच देवाची सेवा’ आणि ‘माणसाची सेवा हीच खरी ईश्‍वरसेवा’ हा संदेश समाजाला मिळतो. संत सावता महाराज पंढरपूरला जाण्यापेक्षा आपल्या कर्तव्याच्या ठिकाणीच विठ्ठलाचे दर्शन घेत होते, अशी त्यांच्या जीवनाशी निगडित लोकपरंपरा आहे. कर्मातच देव पाहण्याचा हा विचार आजच्या काळातही अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे जालिंदर बोरुडे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना भेडसावणारे दृष्टीदोष दूर करून त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी फाऊंडेशन सातत्याने काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी तसेच विविध सण-उत्सवांच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा फिनिक्स सोशल फाऊंडेशनने सुरू ठेवली आहे. त्याचबरोबर दर महिन्याला मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन केले जात असल्याची माहिती बोरुडे यांनी दिली.


नागरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिरात आयोजित या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची नेत्रतपासणी केली. एकूण 325 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 72 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून, पुणे येथील के. के. आय. बुधराणी हॉस्पिटलमध्ये या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. नेत्रतपासणीबरोबरच ज्येष्ठ नागरिकांसाठी रक्तदाब, मधुमेह यासह आवश्‍यक आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या. गरजू रुग्णांना अल्पदरात चष्म्याचे वाटपही करण्यात आले.


फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून केवळ उपचार व आरोग्य शिबिरांपुरते काम मर्यादित न ठेवता नेत्रदान आणि अवयवदानाबाबत समाजात जनजागृती केली जात आहे. नेत्रदानामुळे अंधत्वाच्या अंधारात असलेल्या व्यक्तीच्या जीवनात प्रकाश निर्माण होऊ शकतो, तर अवयवदानामुळे गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या रुग्णांना नवजीवन मिळू शकते. या सामाजिक जाणिवेतून फाऊंडेशनचे कार्य सुरू असून, अनेक दृष्टीहीनांना नेत्रदानाच्या माध्यमातून नवदृष्टी मिळण्यासाठी नेत्रदान करण्याचे आवाहन करण्यात आले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र बोरुडे यांनी केले, तर गौरव बोरुडे यांनी आभार मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी सौरभ बोरुडे, विशाल भिंगारदिवे, प्रितम धाडगे, सोमनाथ हराळे यांच्यासह फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *