राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सन्मान
युवक-युवतींच्या हातात नशेचे पदार्थ नव्हे, तर यशाची ट्रॉफी दिसावी -अल्ताफ सय्यद
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मानवता हाच एक धर्म सामाजिक संस्था व नेक्स्ट लेव्हल फिटनेसच्या माध्यमातून युवक-युवतींना सकारात्मक दिशा देत नशेपासून दूर राहण्याचा आणि आरोग्य-क्रीडा क्षेत्रात आपले करिअर घडविण्याचा संदेश देण्यात आला. तर राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट यश संपादन केलेल्या खेळाडूंचा सन्मान मानवता हाच एक धर्म संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अल्ताफ सय्यद यांच्या हस्ते करण्यात आला.
अल्ताफ सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांमध्ये आरोग्य, क्रीडा आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच सकारात्मक विचारांना बळ देणाऱ्या नेक्स्ट लेव्हल फिटनेस जिममध्ये युवक-युवतींना केवळ व्यायामाची सुविधा नाही, तर क्रीडा क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या जिममध्ये प्रशिक्षण घेतलेल्या अनेक युवकांनी नेक्स्ट लेव्हल फिटनेसचे संस्थापक डेव्हिड मकासारे यांनी युवक-युवतींना प्रेरणादायी संदेश देताना सांगितले की, तरुणाईमध्ये प्रचंड ऊर्जा आणि क्षमता आहे. या ऊर्जेला योग्य दिशा दिली, तर प्रत्येक युवक आपल्या आयुष्यात मोठे यश मिळवू शकतो. मेहनत, शिस्त आणि सातत्याच्या जोरावर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करण्याचे त्यांनी आवाहन केले.
अल्ताफ सय्यद यांनी युवक-युवतींना नशेच्या आहारी न जाण्याचे आवाहन केले. ड्रग्ज, एमडीसारख्या अमली पदार्थांच्या आहारी जाऊन आपले आयुष्य उद्ध्वस्त करू नका. नशा तुमचे आरोग्य, करिअर आणि कुटुंबाचे भविष्य हिरावून घेऊ शकते. त्याऐवजी व्यायाम करा, खेळा आणि आपल्या ध्येयासाठी दिवस-रात्र मेहनत करा, असा संदेश त्यांनी दिला. युवक ही देशाची ताकद आहे. तुमच्या हातात नशेची पुडी नव्हे, तर यशाची ट्रॉफी दिसली पाहिजे. शरीर निरोगी असेल, मन सकारात्मक असेल आणि ध्येय निश्चित असेल तर यशाची शिखरे गाठणे निश्चित शक्य असल्याचे सांगितले.
मानवता हाच एक धर्म या विचारातून युवकांचे आरोग्य, सुरक्षितता आणि उज्ज्वल भविष्य यासाठी सातत्याने काम करण्याचे आवाहन करुन, नशेला नकार देत फिटनेस आणि क्रीडेला स्वीकारण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

