शिंगवे नाईक येथे आदिवासी दिन उत्साहात
उमेद फाऊंडेशन, जिल्हा क्रीडा कार्यालय व मेरा युवा भारतचा संयुक्त उपक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिंगवे नाईक (ता. नगर) येथील रामवाडी जिल्हा परिषद शाळेत जागतिक आदिवासी दिनानिमित्त उमेद सोशल फाऊंडेशन, जिल्हा क्रीडा कार्यालय आणि मेरा युवा भारत यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. आदिवासी समाजातील नागरिकांना आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचेही वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिवासी समाजाचे महानायक, स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमास सुरुवात झाली. आदिवासी संस्कृती, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकास याबाबत उपस्थितांमध्ये जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य विश्वास जाधव, उमेद सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे, उपाध्यक्ष कुणाल तनपुरे, सल्लागार ॲड. दीपक धिवर, राहुरी शाखेचे संघटक श्रीकांत राऊत, उमंग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिऱ्हे, हरीश शेळके, विजय लोंढे, प्रकाश भालेराव आदी उपस्थित होते.
विश्वास जाधव म्हणाले की, आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आणि आरोग्य या दोन बाबींना सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील अनेक कुटुंबांना आरोग्याच्या समस्या असूनही वेळेवर तपासणी आणि उपचार मिळत नाहीत. अशा परिस्थितीत गावाच्या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी झाली तर त्यांच्या शिक्षणावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तके देणे पुरेसे नसून त्यांच्या आरोग्याची आणि सर्वांगीण विकासाची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. उमेद सोशल फाऊंडेशनसह सर्व संस्थांनी राबविलेला हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
उमेद सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे म्हणाले की, समाजाच्या विकासाचा पाया हा शिक्षण आणि आरोग्यावर उभा असतो. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात पुढे आणण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या परीने योगदान देणे गरजेचे आहे. आर्थिक परिस्थितीमुळे एखाद्या विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. आरोग्याबाबतही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जनजागृती होण्याची गरज आहे. आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा आजाराचे वेळीच निदान होणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची तसेच ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या आरोग्य शिबिरात डॉ. अजहर शेख यांनी शालेय विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली. विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेत त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ग्रामस्थांनीही या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी आयोजकांचे आभार मानले.
कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका आयनर सविता, सहशिक्षिका लता पवार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय निकम, सोन्याबापू निकम, अनिल शेळके, एकनाथ निकम, रवींद्र पुंड, भीमराज गोलवंड, राहुल बरकडे, लक्ष्मण कल्हापुरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिनेअभिनेते राजेश मंचरे यांनी करुन आदिवासी गीत व देशभक्तीवरील गीत सादर केले. या उपक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, क्रीडा अधिकारी प्रवीण कोंढावळे, प्रियंका खिंडारे, मेरा युवा भारतचे समन्वय अधिकारी सत्यजित संतोष आणि रमेश घाडगे यांचे मार्गदर्शन लाभले. आभार लता पवार यांनी मानले.

