• Sun. Aug 9th, 2026

Mirrornews24

Marathi News

शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण प्रकरणी मोमिन आखाडाचे माजी उपसरपंचांची निर्दोष मुक्तता

ByMirror

Aug 9, 2026

सरकार पक्षाचे आरोप सिद्ध न झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण करून त्याच्या शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली दाखल गुन्ह्यातील दोन आरोपींची अतिरिक्त सत्र न्यायालय, अहिल्यानगर यांनी निर्दोष मुक्तता केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश एम. तायडे यांनी 6 ऑगस्ट 2026 रोजी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
या प्रकरणातील तक्रारदार हा मोमीन आखाडा ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत असल्याचे सांगण्यात आले होते. ग्रामपंचायतशी संबंधित चेक व फॉर्म क्र. 15 वर स्वाक्षरी घेण्याच्या कारणावरून त्याला जांभोरे यांच्या घरी बोलावण्यात आल्याचा सरकार पक्षाचा आरोप होता. तेथे उपसरपंच शब्बीर बाबुलाल शेख व राजू बाबुलाल शेख यांनी तक्रारदारास लाथाबुयांनी मारहाण केली तसेच चेक व फॉर्म क्र. 15 फाडल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर मोमिन आखाडा, तालुका राहुरी चे माजी उपसरपंच शब्बीर बाबुलाल शेख व त्यांचे भाऊ राजू बाबुलाल शेख, रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर यांच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. I-302/2014 नुसार भारतीय दंड संहितेच्या कलम 353 सह 34 अन्वये आरोप ठेवण्यात आले होते.


सरकार पक्षाने एकूण चार साक्षीदार तपासले. मात्र, तक्रारदार हा घटनेच्या दिवशी शासकीय कर्तव्यावर असलेला सार्वजनिक सेवक होता, हे सिद्ध करण्यासाठी आवश्‍यक नियुक्ती आदेश किंवा अन्य दस्तऐवजी पुरावा सादर करण्यात आला नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. विशेष म्हणजे, तक्रारदाराने उलटतपासणीत घटनेच्या दिवशी तो कर्तव्यावर उपस्थित नव्हता, अशी कबुली दिली होती.


तसेच कथित मारहाणीबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्यात आले नाही. स्वतंत्र प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासण्यात आले नाहीत, तर घटनास्थळी उपस्थित असलेल्या साक्षीदाराने सरकार पक्षाच्या कथनाला दुजोरा दिला नाही. त्यामुळे आरोपींनी तक्रारदारास मारहाण करून त्याच्या शासकीय कर्तव्यात अडथळा आणला, हा आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.


बचाव पक्षातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. हाजी रफिक निजामभाई बेग यांनी युक्तिवाद करत सरकार पक्षाच्या पुराव्यातील त्रुटी व साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. रियाज आर. बेग, ॲड. अयाज आर. बेग, ॲड. फैजान मुर्तजा बेग व ॲड. मुजाहिद पठाण यांनी सहकार्य केले. अखेर सरकार पक्ष आरोपींविरुद्धचा आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने न्यायालयाने शब्बीर बाबुलाल शेख व राजू बाबुलाल शेख यांची निर्दोष मुक्तता केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *