43 गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिबिरातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांच्या जीवनात पुन्हा प्रकाश आला -ह.भ.प. गिरधारी डहाळे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्थेच्या वतीने मिरी (ता. पाथर्डी) येथे मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. संस्थेचे हे 261 वे शिबिर असून, मागील 27 वर्षापासून हा उपक्रम सुरु आहे. मिरीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिराच्या माध्यमातून 43 गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदूच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, अनेकांना नवदृष्टी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळाले.
या शिबिराचे उद्घाटन ह.भ.प. गिरधारी डहाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, दृष्टी म्हणजे जीवनाचा प्रकाश आहे. दृष्टी गेल्यानंतर माणसाचे जगणेच अंधारमय होते. अशा वेळी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांच्या जीवनात पुन्हा प्रकाश निर्माण करण्याचे पवित्र कार्य पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्था सातत्याने करत आहे. ही सेवा म्हणजे केवळ आरोग्यसेवा नसून मानवतेची खरी उपासना असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवखेडे खालसाचे सरपंच चारुदत्त वाघ होते. त्यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घेतला. ग्रामीण भागात अशा प्रकारचे आरोग्य उपक्रम अधिकाधिक राबविण्याची गरज असून, संस्थेच्या कार्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
शिबिराचे संयोजक मेजर शिवाजी वेताळ यांनी प्रस्ताविकात संस्थेच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, “समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविणे हे संस्थेचे ध्येय आहे. आजपर्यंत 261 मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. हा केवळ आकडा नसून समाजसेवेप्रती असलेले सातत्य आणि रुग्णसेवेची बांधिलकी दर्शविणारा प्रवास आहे. भविष्यातही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अशाच प्रकारचे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिबिरादरम्यान मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली. तपासणीनंतर मोतीबिंदू झालेल्या रुग्णांची निवड करून त्यांना मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले होते. शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर हे सर्व रुग्ण नवदृष्टी मिळाल्याचा आनंद व्यक्त करत आपल्या गावी परतले. अनेकांनी संस्थेच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिबिर यशस्वी करण्यासाठी अनिता वेताळ यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच ग्रामस्थ, स्वयंसेवक आणि संस्थेच्या सदस्यांचे सहकार्य लाभले.

