• Thu. Aug 6th, 2026

Mirrornews24

Marathi News

सेवाभावातून उभे राहिलेले आनंदऋषीजी हॉस्पिटल हे रुग्णसेवेचे आदर्श मॉडेल – पेमराज बोथरा

ByMirror

Aug 5, 2026
सेवाभावातून उभे राहिलेले आनंदऋषीजी हॉस्पिटल हे रुग्णसेवेचे आदर्श मॉडेल – पेमराज बोथरा

आचार्य श्री आनंदऋषीजी महाराजांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त विविध आरोग्य शिबिरांना प्रारंभ; जनरल सर्जरी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने उभे राहिलेले आनंदऋषीजी हॉस्पिटल हे केवळ उपचार करणारे रुग्णालय नसून सेवाभाव, विश्वास आणि सामाजिक बांधिलकी यांचे जिवंत प्रतीक बनले आहे. सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देत हे हॉस्पिटल आज रुग्णसेवेचे आदर्श मॉडेल ठरले असल्याचे गौरवोद्गार बडीसाजन श्री संघाचे अध्यक्ष तथा उद्योजक पेमराज बोथरा यांनी काढले.


जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त स्व. सौ. जतनबाई मानकचंदजी बोथरा यांच्या स्मरणार्थ बोथरा परिवार (पारस ग्रुप) यांच्या सहकार्याने आयोजित जनरल सर्जरी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून जयंतीनिमित्त आयोजित विविध आरोग्य शिबिरांना औपचारिक प्रारंभ झाला.


यावेळी संतोष बोथरा, सतीश बोथरा, मनीषा बोथरा, संगीता बोथरा, प्रतिभा बोथरा, प्रनेश बोथरा, रोनक बोथरा, गौरव बोथरा, रोहन बोथरा, प्रसन्ना बोथरा, प्रणित बोथरा, खुशक बोथरा, समीक्षा बोथरा, श्रेया बोथरा, दर्शना बोथरा, डॉ. वसंत कटारिया, सतीश लोढा, माणकचंद कटारिया, डॉ. आशिष भंडारी, प्रकाश छल्लाणी, निखीलेंद्र लोढा, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, जनरल सर्जन डॉ. भास्कर जाधव, डॉ. महेश घुगे, डॉ. प्रवीण मुनोत, डॉ. विवेक भापकर आदी मान्यवर उपस्थित होते.


प्रास्ताविकात निखीलेंद्र लोढा यांनी बोथरा परिवाराच्या सामाजिक कार्याचा आढावा घेताना सांगितले की, उद्योग क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करतानाच बोथरा परिवाराने तन, मन आणि धनाने आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या सेवाकार्यात मोलाचे योगदान दिले आहे. हॉस्पिटलच्या उभारणीपासून ते विस्तारापर्यंत, घरकुल योजना, २५ व्हिजन सेंटरची स्थापना आणि सावेडी येथील नव्या बहुविशेषता रुग्णालयाच्या उभारणीतही या परिवाराचा मोठा सहभाग आहे. मानकचंदजी बोथरा यांनी दिलेला समाजसेवेचा वारसा नवीन पिढी समर्थपणे पुढे नेत असल्याचे त्यांनी नमूद केले.


डॉ. वसंत कटारिया यांनी बोथरा परिवाराच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक करताना सांगितले की, आर्थिक मदत करणारे अनेक असतात; मात्र स्वतःचा वेळ देऊन कार्य करणारे फार कमी असतात. बोथरा परिवाराने रुग्णसेवेला आपले ध्येय मानून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.


प्रणित बोथरा यांनी सांगितले की, “स्वतःच्या प्रगतीबरोबर समाजाचीही प्रगती झाली पाहिजे,” हा आजोबा मानकचंदजी बोथरा यांचा संस्कार आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्याच विचारातून नवीन पिढी सामाजिक उत्तरदायित्वाची परंपरा पुढे नेत आहे.
जनरल सर्जन डॉ. भास्कर जाधव यांनी सांगितले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या रुग्णसेवेला यंदा २५ वर्षे पूर्ण होत असून, वर्षभर विविध आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना लाभ मिळतो. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, सवलतीच्या दरातील तपासण्या आणि परवडणाऱ्या शस्त्रक्रिया ही या संस्थेची वैशिष्ट्ये आहेत.


या जनरल सर्जरी शिबिरात ११० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. अपेंडिक्स, इन्ग्वायनल हर्निया, हायड्रोसिल आदी शस्त्रक्रिया गरजू रुग्णांसाठी सवलतीच्या दरात करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले, तर प्रकाश छल्लाणी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *