• Sun. Aug 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

कै. बाजीराव पाटील सोनवणे वस्तीगृहात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

ByMirror

Aug 1, 2026
अण्णाभाऊंच्या विचारांना अभिवादन; विद्यार्थ्यांना सामाजिक परिवर्तनाचा संदेश

अण्णाभाऊंच्या विचारांना अभिवादन; विद्यार्थ्यांना सामाजिक परिवर्तनाचा संदेश


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील गांधी मैदान परिसरातील कै. बाजीराव पाटील सोनवणे वस्तीगृहात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाबा राजगुरू होते. प्रमुख उपस्थितीमध्ये मानवी हक्क अभियानचे जिल्हा संघटक तसेच भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा शहर जिल्हा सरचिटणीस अशोक भोसले, ज्ञानदेव चांदणे, विकी साळवे, शेखर आडेप, वस्तीगृहाचे अधीक्षक, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला. त्यांनी आपल्या लेखणीतून समाजातील शोषित, वंचित आणि कष्टकरी वर्गाच्या भावना प्रभावीपणे मांडल्या. समता, स्वाभिमान, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविल्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा अभ्यास करण्याचे आणि त्यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेऊन शिक्षण, कष्ट आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर स्वतःचे भविष्य घडविण्याचे आवाहन करण्यात आले.


अशोक भोसले म्हणाले की, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. त्यांच्या साहित्यामध्ये समाजजागृती, स्वाभिमान आणि मानवतेचा संदेश आहे. म्हणूनच त्यांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांचे जीवनचरित्र आणि साहित्य वाचून संघर्षातून यश मिळविण्याची प्रेरणा घ्यावी. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन असून, ज्ञानाच्या बळावरच समताधिष्ठित आणि सक्षम समाजाची निर्मिती होऊ शकते. प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपत गरजू घटकांच्या उन्नतीसाठी कार्य केले, तर तीच अण्णाभाऊ साठे यांना खरी आदरांजली ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *