जागतिक मानव तस्करी विरोधी दिनाचा उपक्रम
गावपातळीवरील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस पाटील व कोतवाल महत्त्वाचा दुवा -विकास ढोकरे (सहाय्यक पोलीस निरीक्षक)
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या वतीने जागतिक मानव तस्करी विरोधी दिनानिमित्त संगमनेर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात पोलिस पाटील व कोतवाल यांच्यासाठी कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत 125 हून अधिक पोलिस पाटील व कोतवाल सहभागी झाले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे यांनी सांगितले की, मानवी तस्करी, वेठबिगारी व बालमजुरी ही गंभीर सामाजिक आव्हाने असून, त्यांना आळा घालण्यासाठी गावपातळीवर सतर्कता आणि जनजागृती अत्यंत आवश्यक आहे. पोलिस पाटील व कोतवाल हे प्रशासन आणि गावकऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा असून, त्यांच्या सतर्कतेमुळे अनेक गुन्हे रोखण्यास मदत होऊ शकते. वेठबिगार पद्धतीचे उच्चाटन अधिनियम, 1976 याबाबत गावागावात जनजागृती करण्याचे कार्य सामाजिक संस्थांकडून होत असल्याबद्दल त्यांनी कौतुक व्यक्त केले.
कार्यशाळेत गोरख जाधव यांनी वेठबिगारी, बालमजुरी व मानवी तस्करीसंदर्भातील कायदे, पीडितांचे संरक्षण, बचावकार्य व पुनर्वसन याबाबत मार्गदर्शन केले.
संस्थेचे जिल्हा समन्वयक सिराज शेख यांनी सांगितले की, श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ गेल्या चार वर्षांपासून अहिल्यानगर, पुणे व नाशिक जिल्ह्यांत वेठबिगारी निर्मूलनासाठी कार्यरत असून, संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत 200 हून अधिक वेठबिगारांची सुटका करून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास बाळासाहेब मधुकर यादव, गोरख जाधव व निलेश छडीदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक दिलीप गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दत्ता मेंगळ, आंबादास गुंजाळ, मंगेश थोरात, गोरख धात्रक, सागर विटकर, मयुरी वनवे व संदीप काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

