• Fri. Jul 31st, 2026

Mirrornews24

Marathi News

शिक्षण ही सर्वात मोठी गुंतवणूक, तर शाळा मुलांचे भविष्य घडविणारी केंद्रे-आनंद भंडारी

ByMirror

Jul 31, 2026
शिक्षण ही सर्वात मोठी गुंतवणूक, तर शाळा मुलांचे भविष्य घडविणारी केंद्रे-आनंद भंडारी

निरंजन सेवाभावी संस्थेकडून 700 गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व; विद्यार्थ्यांना वर्षभराची शैक्षणिक किटचे वितरण


शैक्षणिक किटमध्ये टोपीपासून छत्रीपर्यंत सर्व आवश्‍यक शैक्षणिक साहित्याचा समावेश


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या शाळा आजही अनेक खाजगी शाळांपेक्षा अधिक दर्जेदार शिक्षण देत आहेत. त्यामुळे या शाळांचे अस्तित्व टिकविणे ही काळाची गरज असून, त्या मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्यासाठी स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना आणि दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा. जिल्हा परिषद शाळा टिकल्या नाहीत तर शिक्षणाचे बाजारीकरण होईल आणि त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना बसेल. त्यामुळे गावागावातील शाळांची जबाबदारी स्वीकारून त्यांना सक्षम करण्यासाठी समाजाने पुढे यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले.


निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने 14 वर्षांपासून संस्था गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक पालकत्वाची संकल्पना राबवत असून, यंदा तब्बल 3 हजार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पालकत्वाचा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्यात आला आहे. तसेच अहिल्यानगर मधील जिल्हा परिषद व इतर शाळांमधील गरजू घटकातील 700 विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी आवश्‍यक शैक्षणिक किटचे वितरण करुन शैक्षणिक पालकत्व उपक्रम राबविण्यात आला. यावेळी भंडारी बोलत होते. माऊली सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उद्योजक अनुराग धुत, उदयोजक राघवेंद्र बिहाणी, उदयोजक कमलेश झंवर , जिल्हा परिषद सीएसआर समितीचे रमेश कासार निरंजन संस्थेचे अतुल डागा, जयेश कासट, स्वप्निल कुलकर्णी , राहुल झंवर , मुकुंद धुत, सुमित चांडक, राहुल ओझा, दिनेश भाटिया, अभिजीत बिहानी, योगेश सिकची, पियुष झंवर, गोविंद दरक, सिद्धार्थ झंवर,पवन बंग , सौ प्राजक्ता डागा , रोहन मंत्री, प्रसाद बजाज, वैभव जाधव यांच्यासह संस्थेचे सदस्य, शालेय शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे आनंद भंडारी म्हणाले की, निरंजन सेवाभावी संस्थेने सामाजिक उत्तरदायित्व ओळखून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. प्रत्येकजण स्वतःच्या कुटुंबासाठी आयुष्य जगतो; मात्र काही व्यक्ती समाजाचाही विचार करतात. अशा संस्थांमध्ये निरंजन सेवाभावी संस्थेचा अग्रक्रम असून, संस्थेने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पालकत्वाची भूमिका स्वीकारत एका जबाबदार पालकाप्रमाणे त्यांच्या शिक्षणासाठी आवश्‍यक साहित्य उपलब्ध करून दिले आहे.


ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शैक्षणिक किटमध्ये टोपीपासून छत्रीपर्यंत सर्व आवश्‍यक शैक्षणिक साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांसाठी आज अनेक दाते पुढे येत आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. आमच्या शिक्षणाच्या काळात परिस्थिती अत्यंत कठीण होती. चप्पल नव्हती, शर्ट-पॅन्ट फाटलेले असायचे, अशा परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. मात्र आजच्या विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्यांना वेळेवर मदत केली जात आहे, ही बाब अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.


भंडारी यांनी सांगितले की, शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत अहिल्यानगर जिल्हा परिषद राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोकणातील दोन जिल्ह्यांनंतर अहिल्यानगरने हे यश मिळविले आहे. पालक आणि ग्रामस्थांमध्ये शिक्षणाविषयी जागृती वाढत असून, ग्रामीण भागात शिक्षणासाठी तळमळीने योगदान दिले जात आहे. शिक्षण क्षेत्र झपाट्याने बदलत असून, शिक्षण ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. शाळा आणि अंगणवाडी ही मुलांचे भविष्य घडविणारी केंद्रे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. धार्मिक स्थळांसाठी कोट्यवधी रुपयांच्या देणग्या जमा होत असताना ज्ञानाचे मंदिर उभारण्यासाठीही गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात निरंजन सेवाभावी संस्थेचे अतुल डागा यांनी सांगितले की, भावी पिढी शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम घडावी या उद्देशाने गेल्या 14 वर्षांपासून शैक्षणिक पालकत्वाचा उपक्रम राबविला जात आहे. नुकतेच पुणे येथे 2 हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक पालकत्व देण्यात आले असून, अहिल्यानगरमध्ये सध्या 700 विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट देण्यात आली आहे. याशिवाय लवकरच आणखी 300 विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी शैक्षणिक किटचे वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.
उद्योजक अनुराग धुत म्हणाले की, देश घडविणारी भावी पिढी शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत दिशादर्शक आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य शिक्षणातूनच घडणार असून, आजची मुले ही उद्याच्या भारताचे सक्षम नागरिक आणि देश घडविणारे युवक ठरणार असल्याचे स्पष्ट केले.


रमेश कासार यांनी सांगितले की, निरंजन सेवाभावी संस्था सामाजिक बांधिलकी जपत गरजू आणि वंचित घटकांना आधार देण्याचे काम करत आहे. वंचित विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्थेचे उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहेत. एखाद्या पालकाप्रमाणे विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य आणि आवश्‍यक वस्तू उपलब्ध करून देत शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संस्था करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. जे. प्रसन्न जोशी यांनी केले, तर आभार स्वप्निल कुलकर्णी यांनी मानले.


–—
विद्यार्थ्यांच्या घोषणांनी सभागृह दणाणले; ग्रंथदिंडीने वेधले सर्वांचे लक्ष
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत विद्यार्थ्यांच्या आकर्षक ग्रंथदिंडीने करण्यात आले. वारकरी वेशातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा जागर करत टाळ-लेझीमच्या गजरात ग्रंथदिंडी काढली. या अनोख्या उपक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. निरंजन सेवाभावी संस्थेकडून मिळालेली शैक्षणिक किट स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. सुमारे 700 विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी तुडुंब भरलेल्या सभागृहात विद्यार्थ्यांनी हात उंचावून “निरंजन सेवा, निरंतर सेवा”, “निरंजनच्या नावाने चांगभलं!” अशा उत्स्फूर्त घोषणा देत संपूर्ण सभागृह दणाणून सोडले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *