विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी AI शिक्षण, संस्कार आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीवर भर- डॉ. प्रसाद उबाळे
पालक सभेसाठी शंभर टक्के उपस्थिती
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील पहिली पालक सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आयुर्वेदाचार्य डॉ. प्रसाद उबाळे हे होते, तर अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार शिक्षण संस्थेचे सहकार्यवाह डॉ. रवींद्र चोभे उपस्थित होते. यावेळी संस्था समन्वयक डॉ. गोकुळदास लोखंडे, आरोग्य भारतीचे डॉ. राजेश परदेशी, श्रीपाद शिंदीकर, कैलास चोथे आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल झिरपे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
प्रास्ताविकात विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप भोर यांनी सांगितले की, शाळा आणि पालक यांच्यातील समन्वय विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. बदलत्या काळानुसार विद्यालयात बुद्धिमत्ता (AI) आधारित अध्यापनाला प्राधान्य देण्यात आले असून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच मंथन प्रज्ञाशोध, शिष्यवृत्ती परीक्षा, स्कॉलरशिप, इंडियन नॅशनल ऑलिम्पियाड, नवोदय प्रवेश परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षा यांच्या माध्यमातून विद्यालयाचा गुणवत्ता आलेख अधिक उंचावण्यासाठी पालकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख अतिथी आयुर्वेदाचार्य डॉ. प्रसाद उबाळे यांनी आपल्या मार्गदर्शनात पालकांची भूमिका ही मुलांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. मुलांची नियमित दिनचर्या, संतुलित व पौष्टिक आहार, चांगले संस्कार, शिस्तबद्ध जीवनशैली आणि सकारात्मक कौटुंबिक वातावरण यांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर मोठा प्रभाव पडतो,विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या स्पर्धेत न अडकता आपल्या आवडीनुसार करिअरची दिशा निवडावी, त्यासाठी पालकांनी मुलांशी सातत्याने संवाद साधून त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. रवींद्र चोभे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच मैदानी खेळ, व्यायाम, संस्कार आणि महिला सक्षमीकरणाची जाणीव महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता खिलारी यांनी केले, मुख्याध्यापक संदीप भोर यांनी आभार मानले. सभेला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

