• Fri. Jul 31st, 2026

Mirrornews24

Marathi News

अशोकचक्राच्या संविधानिक नैतिकतेतून जातिनिर्मूलनाचा एल्गार!

ByMirror

Jul 30, 2026
‘जातिनिर्मूलनासाठी तिरंगा सत्याग्रहाद्वारे केली जाणार भारतीयांमध्ये जागृती -ॲड. कारभारी गवळी

8 ऑगस्टपासून ‘तिरंगा सत्याग्रह’; ‘पीपल्स हेल्पलाईन’ आणि ‘भारतीय जनसंसद’चा पुढाकार


‘जातिनिर्मूलनासाठी तिरंगा सत्याग्रहाद्वारे केली जाणार भारतीयांमध्ये जागृती -ॲड. कारभारी गवळी


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय संसदीय लोकशाहीला व्यक्तिपूजा, घराणेशाही, जातीय व धार्मिक ध्रुवीकरण, धनशक्ती, भ्रष्टाचार आणि निष्क्रिय नोकरशाहीच्या विळख्यातून मुक्त करण्याच्या उद्देशाने येत्या 8 ऑगस्ट 2026 पासून देशभर ‘जंतर-मंतर क्रांती दिवस’ पाळून ‘तिरंगा सत्याग्रह’ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा ‘पीपल्स हेल्पलाईन’ आणि ‘भारतीय जनसंसद’च्या वतीने करण्यात आली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून संविधाननिष्ठ लोकशाही, सामाजिक समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि लोकाभिमुख प्रशासन याबाबत व्यापक जनजागृती केली जाणार असल्याची माहिती पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.


यावेळी बोलताना ॲड. गवळी यांनी सांगितले की, तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नसून भारतीय लोकशाहीची मूल्यव्यवस्था आणि संविधानिक तत्त्वज्ञानाचे प्रभावी प्रतीक आहे. तिरंग्याचा मूळ सन्मान आणि स्वरूप अबाधित ठेवून त्यातील प्रत्येक रंगामागील लोककल्याणकारी मूल्ये समाजात रुजविण्याचा प्रयत्न या सत्याग्रहातून केला जाणार आहे.
तिरंग्यातील रंगांची नव्या दृष्टिकोनातून मांडणी करुन तिरंगा सत्याग्रहाच्या माध्यमातून राष्ट्रध्वजातील रंगांना विशिष्ट लोकशाही मूल्यांशी जोडण्यात आले आहे. केशरी रंग लोकभक्ती : केवळ मानवकल्याण नव्हे, तर संपूर्ण जीवसृष्टी, पर्यावरण आणि निसर्गसंवर्धनाची बांधिलकी. पांढरा रंग ज्ञानभक्ती : अद्ययावत ज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकनिष्ठ विचार आणि पारदर्शक निर्णयप्रक्रिया. हिरवा रंग कर्मभक्ती : प्रत्यक्ष, प्रामाणिक, जबाबदार आणि परिणामकारक लोकसेवा. अशोकचक्र संविधानिक नैतिकता : कायद्याचे राज्य, समानता, सामाजिक न्याय, जातिनिर्मूलन आणि लोकशाही मूल्यांचे अखंड प्रतीक.


ॲड. गवळी यांनी स्पष्ट केले की, अशोकचक्र हे केवळ राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी असलेले निळे चक्र नसून, ते संविधानिक मूल्यांचे सतत स्मरण करून देणारे न्यायचक्र आहे. लोकभक्ती संविधानाशिवाय भावनिक लोकानुनयात, ज्ञानभक्ती लोकशाही नियंत्रणाशिवाय तंत्रशाहीत (Technocracy) आणि कर्मभक्ती कायद्याच्या चौकटीशिवाय मनमानीत रूपांतरित होऊ शकते. त्यामुळे अशोकचक्राचे अखंड फिरणे म्हणजे सत्ता, प्रशासन आणि समाजावर संविधानिक नैतिकतेचे सातत्याने नियंत्रण राहणे होय.


तिरंगा सत्याग्रहाच्या संकल्पनेमागील विचार स्पष्ट करताना ॲड. गवळी म्हणाले की, मानसशास्त्रज्ञ कार्ल युंग यांच्या प्रतीकसिद्धांतानुसार प्रभावी प्रतीके मानवी चेतना, भावना आणि सामूहिक वर्तनावर परिणाम घडवू शकतात. त्याच दृष्टिकोनातून तिरंगा हा भारतीयांच्या भावनिक चेतनेला संविधाननिष्ठ, विवेकाधिष्ठित आणि लोकशाही मूल्यांकडे प्रेरित करणारा राष्ट्रीय प्रेरणास्रोत ठरू शकतो.


या तिरंगा सत्याग्रहाचा केंद्रबिंदू जातिनिर्मूलन असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जन्माधारित उच्च-नीचता, अस्पृश्‍यता, जातीय बहिष्कार आणि सामाजिक वर्चस्व या प्रवृत्ती संविधानाच्या समानतेच्या तत्त्वाशी विसंगत असल्याचे त्यांनी नमूद केले. याबाबत बोलताना ॲड. गवळी म्हणाले, “अशोकचक्र हे जन्माधारित विषमतेवर अखंड फिरणारे संविधानिक न्यायचक्र आहे. जातिव्यवस्था टिकविणारी लोकशाही ही पूर्ण लोकशाही असू शकत नाही. सामाजिक समता आणि संविधानिक न्यायाशिवाय लोकशाहीची संकल्पना अपुरी राहते.” हा तिरंगा सत्याग्रह कोणत्याही एका राजकीय पक्षासाठी, विचारसरणीसाठी किंवा उमेदवारासाठी नसल्याचे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, हा उपक्रम प्रत्येक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकाच्या लोकशाही जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. सार्वजनिक जीवनात लोककल्याणाचे ध्येय, ज्ञानाधिष्ठित विवेक, प्रामाणिक लोकसेवा आणि संविधाननिष्ठ आचरण हेच नेतृत्वाचे खरे निकष असावेत, हा संदेश देशभर पोहोचविण्यासाठी 8 ऑगस्टपासून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे ॲड. गवळी यांनी सांगितले.


या सत्याग्रहासाठी अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीरबहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे, ॲड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले, प्रकाश गोसावी यांच्यासह अनेक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *