• Thu. Jul 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

लायन्स इंटरनॅशनलच्या युवा सांस्कृतिक देवाणघेवाण उपक्रमांतर्गत परदेशातील चार युवा प्रतिनिधी अहिल्यानगरात

ByMirror

Jul 29, 2026
लायन्स क्लब ऑफ अहमदनगरने स्विकारले यजमानपद

श्री विशाल गणपतीचे दर्शन घेऊन विविध ठिकाणी भेट; नगरकरांच्या पाहुणचाराने भारावले; भारतीय संस्कृतीचा घेत आहेत प्रत्यक्ष अनुभव


लायन्स क्लब ऑफ अहमदनगरने स्विकारले यजमानपद


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लायन्स इंटरनॅशनलच्या जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित इंटरनॅशनल यूथ एक्स्चेंज प्रोग्राम अंतर्गत तुर्कस्तान, बेल्जियम, डेन्मार्क आणि हंगेरी या चार देशांतील युवा प्रतिनिधी सध्या अहिल्यानगरात वास्तव्यास असून भारतीय संस्कृती, परंपरा, अध्यात्म, सामाजिक जीवन आणि कौटुंबिक मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत. या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमाचे यजमानपद लायन्स क्लब ऑफ अहमदनगर यांनी स्वीकारले असून, लायन्स मल्टिपल डिस्ट्रिक्टच्या यूथ एक्स्चेंज चेअरमन लायन दिपेश जोशी (मुंबई) व लायन्स क्लबचे अध्यक्ष हरजीतसिंग वधवा यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.


या कार्यक्रमात तुर्कस्तान (इस्तंबूल) येथील अभिनेत्री डेफ्ने एर्सेन (Defne Ersen), बेल्जियमची ईव्हा-लुना बेलॉय (Eva-Luna Beloy), डेन्मार्कचा एलियट केलर लॉरिट्‌झेन (Elliot Keller Lauritzen) आणि हंगेरीचा फाबोक मॅत्यास (Fabok Matyas) हे चार युवा प्रतिनिधी या उपक्रमाह सहभागी होवून शहरात दाखल झाले आहेत.
भारतीय संस्कृतीचा जवळून अनुभव मिळावा या उद्देशाने प्रत्येक प्रतिनिधीचा मुक्काम स्थानिक लायन्स सदस्यांच्या कुटुंबात ठेवण्यात आला आहे. डेफ्ने एर्सेन या हरजीतसिंग वधवा यांच्या कुटुंबात, ईव्हा-लुना बेलॉय या सी.ए. राजेंद्र काळे यांच्या कुटुंबात, एलियट केलर लॉरिट्‌झेन हे लायन सुनील छाजेड यांच्या कुटुंबात, तर फाबोक मॅत्यास हे लायन किरण भंडारी यांच्या कुटुंबात वास्तव्यास आहेत. भारतीय कुटुंबासोबत राहून ते येथील जीवनपद्धती, खाद्यसंस्कृती, सण-उत्सव आणि सामाजिक परंपरा समजून घेत आहेत.


अहिल्यानगरातील वास्तव्यात या युवा प्रतिनिधींनी पुणे शहरासह परिसरातील विविध ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट दिली. त्यांनी अवतार मेहेर बाबा समाधीस्थळ, आनंदधाम, गुरुद्वारा भाई दयासिंगजी, ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर तसेच शहरातील इतर महत्त्वाच्या स्थळांचे दर्शन घेतले. श्री विशाल गणपती मंदिरातील पारंपरिक आरतीत सहभागी होत त्यांनी भारतीय धार्मिक परंपरेचा अनुभव घेतला. यावेळी अशोक कानडे यांनी परदेशी युवकांचे स्वागत केले. याप्रसंगी अरिहंत कोठारी, सुजल नारंग, कल्याण बागरेचा, आनंद कटारिया, डॉ. सिमरन वधवा आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीची ओळख करून देण्यासाठी त्यांना पारंपरिक ढोल-पथकाचे सादरीकरण दाखविण्यात आले. सावेडी येथील दिंडीत त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला तसेच स्थानिक महिलांसोबत फुगडी खेळून मराठी संस्कृतीचा आनंद लुटला. भारतीय पाहुणचार, स्थानिक खाद्यपदार्थ, लोककला आणि सामाजिक एकात्मतेचा अनुभव घेताना सर्व विदेशी युवकांनी विशेष आनंद व्यक्त केला.


या अभ्यासदौऱ्याच्या पुढील टप्प्यात हे प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, जागतिक वारसा स्थळ वेरूळ लेणी, शिर्डी, श्री शनिशिंगणापूर आणि श्रीक्षेत्र देवगड येथे भेट देणार आहेत. त्यानंतर भारतातील विविध राज्यांमध्ये आलेल्या 38 आंतरराष्ट्रीय युवा प्रतिनिधींसोबत दिल्ली, जयपूर, आग्रा आणि मुंबई या शहरांच्या सांस्कृतिक अभ्यासदौऱ्यात सहभागी होऊन भारताच्या विविधतेचा, इतिहासाचा आणि सांस्कृतिक वारशाचा अभ्यास करणार आहेत.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आदित्य छाजेड, गुरनूरसिंग वाधवा, सई काळे, दिपेश कोठारी, डॉ. सिमरनकौर वाधवा, प्रणिता भंडारी आणि भावना छाजेड हे सातत्याने विशेष परिश्रम घेत असून, विदेशी पाहुण्यांच्या निवास, प्रवास, सांस्कृतिक कार्यक्रम आणि दैनंदिन समन्वयाची जबाबदारी ते अत्यंत आत्मीयतेने सांभाळत आहेत.


लायन्स क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष हरजीतसिंग वाधवा, सचिव हरीश हरवानी, कोषाध्यक्ष विजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. तसेच माजी अध्यक्ष संजय आसनानी, प्रशांत मुनोत, दिलीप कुलकर्णी आणि धनंजय भंडारे यांचेही या उपक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे. विविध देशांतील युवकांना भारतीय संस्कृती, अध्यात्म, सामाजिक मूल्ये आणि “अतिथी देवो भव” या परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव देत जागतिक मैत्री, सांस्कृतिक सलोखा आणि आंतरराष्ट्रीय बंधुभाव अधिक दृढ करण्याचा हा उपक्रम लायन्स इंटरनॅशनलच्या सेवाभावी कार्याचा उत्कृष्ट नमुना ठरत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *