दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत मार्गदर्शन; तज्ञ शिक्षक उपलब्ध
साऊथ आफ्रिकेतील इंजिनिअर अकिब सय्यद यांचा शिक्षणासाठी पुढाकार
विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी तवस्सुल अकॅडमी देवदूताची भूमिका पार पाडणार -तेजश्री थोरात (सहाय्यक पोलीस निरीक्षक)
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर परिसरातील गरजू व होतकरू मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण आणि गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या उद्देशाने तवस्सुल अकॅडमीच्या वतीने मोफत कोचिंग क्लास सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी नगरसेवक समद खान, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी, विश्व मानव अधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नवेद शेख, मौलाना आझादचे प्राचार्य फरजाना मिर्जा, तवस्सुल फाउंडेशनचे अध्यक्ष असीफ सय्यद, तारीक सय्यद, मोइन खान, समीर खान, सूफियान शेख, मुफ्ती अल्ताफ, अकबरअली शेख, जावेद शेख, जुनेद खान, फरहीन मोहसिन शेख यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मोफत कोचिंग क्लाससाठी साऊथ आफ्रिकेत इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले अकिब सय्यद यांनी आर्थिक सहकार्य केले असून, त्यांच्या पुढाकारातूनच हा उपक्रम साकार झाला आहे. या अकॅडमीमध्ये मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमातील दहावीच्या विद्यार्थ्यांना अनुभवी आणि दर्जेदार शिक्षकांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. तर पुढील टप्प्यात अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून, शिक्षकांचे मानधन तसेच इतर भौतिक सुविधांचा संपूर्ण खर्च अकिब सय्यद स्वतः करणार आहेत. यासाठी त्यांनी स्वतःची जागाही उपलब्ध करून दिली आहे. परदेशात राहूनही आपल्या मायदेशातील गरजू विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या सामाजिक जाणिवेतून त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.
प्रास्ताविकात साहेबान जहागीरदार यांनी शिक्षणाच्या वाढत्या बाजारीकरणावर भाष्य करताना सांगितले की, आज महागड्या कोचिंग क्लासमुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे कठीण झाले आहे. अनेक विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असूनही आर्थिक अडचणींमुळे त्यांना संधी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी अकिब सय्यद यांनी स्वतःची जागा शिक्षणासाठी उपलब्ध करून दिली असून, संपूर्ण आर्थिक जबाबदारीही स्वीकारली आहे. सात समुद्रापार राहूनही आपल्या मातृभूमीशी नाळ जोडून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचा त्यांनी घेतलेला संकल्प प्रेरणादायी असल्याचे जहागीरदार यांनी नमूद केले.
प्राचार्य फरजाना मिर्जा यांनी हा उपक्रम समाजाला नवी दिशा देणारा असल्याचे सांगितले. शिक्षणाच्या या चळवळीत शिक्षक म्हणून आम्हीही सक्रिय सहभाग घेणार आहोत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पालकांमध्ये जागृती होणे आवश्यक असून, समाजातील प्रत्येक घटकाने या उपक्रमात सहभागी होऊन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ‘तवस्सुल’ या अरबी शब्दाचा अर्थ ईश्वर आणि माणसामधील दुवा किंवा मध्यस्थी असा होतो. त्याचप्रमाणे ही अकॅडमी विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी देवदूताची भूमिका बजावणार आहे. जगात सर्वांत मोठी गरज शिक्षणाची असून, शिक्षणाच्या माध्यमातून इतर सर्व अडचणींवर मात करता येते. भविष्यात शिक्षणच समाजाला सक्षम बनवू शकते. समाजाची खरी गरज ओळखून सुरू झालेल्या या मोफत कोचिंग क्लासमुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी अकॅडमीच्या वतीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत 98 % पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याला नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बक्षीस म्हणून देण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
–—–
अशी झाली ‘तवस्सुल अकॅडमी’ची पायाभरणी; अनेक विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवी दिशा देणारा उपक्रम
साऊथ आफ्रिकेत इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले अकिब सय्यद यांनी आपल्या मित्र साहेबान जहागीरदार यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करताना गरजू नागरिकांसाठी मोफत भोजन सेवा आणि मोफत रक्तचाचणी सेवा सुरू करण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यावेळी साहेबान जहागीरदार यांनी त्यांना, “लोकांना फक्त मोफत वस्तू देऊ नका, अन्यथा ते कायम गरीबच राहतील. त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण द्या आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम करा,” असा सल्ला दिला. या विचाराने प्रेरित होऊन अकिब सय्यद यांनी ‘तवस्सुल अकॅडमी’ स्थापन करून दहावीच्या गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग क्लास सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज त्या संकल्पनेचे वास्तवात रूपांतर झाले असून, हा उपक्रम अनेक विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवी दिशा देण्याचे काम करणार आहे.

