• Thu. Jul 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

उज्जैनच्या महामंडलेश्‍वरांवरील प्राणघातक हल्ल्याचा अहिल्यानगरात निषेध

ByMirror

Jul 23, 2026
उज्जैनच्या महामंडलेश्‍वरांवरील प्राणघातक हल्ल्याचा अहिल्यानगरात निषेध

विश्‍व सनातन धर्म सूर्य सेनेचे निवेदन; दोषींवर कठोर कारवाई व झेड प्लस सुरक्षेची मागणी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मध्यप्रदेशातील उज्जैन येथे मौनतीर्थ पीठ आश्रमाचे महामंडलेश्‍वर स्वामी डॉ. सुमनानंद गिरीजी महाराज यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ अहिल्यानगर शहरात विश्‍व सनातन धर्म सूर्य सेना (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या घटनेतील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच स्वामी डॉ. सुमनानंद गिरीजी महाराज यांना तातडीने झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पाठविण्यात आले.


यावेळी प्रदेश संघटन सचिव गणेशभाऊ बनकर, सामाजिक कार्यकर्ते गोरख पडोळे यांच्यासह विश्‍व सनातन धर्म सूर्य सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या गंभीर घटनेबाबत केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, उज्जैन येथील मौनतीर्थ पीठ आश्रमाचे पूज्य श्री श्री 1008 महामंडलेश्‍वर स्वामी डॉ. सुमनानंद गिरीजी महाराज हे अनेक वर्षांपासून हिंदू धर्म, संस्कृती, अध्यात्म, धार्मिक परंपरा आणि सामाजिक जागृतीसाठी सातत्याने कार्यरत आहेत. धर्मप्रसार, संस्कृती संवर्धन आणि समाजात आध्यात्मिक मूल्ये रुजविण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. अशा संतपुरुषांवर झालेला प्राणघातक हल्ला हा अत्यंत निषेधार्ह असून संपूर्ण हिंदू समाजाच्या भावना दुखावणारा आहे.


या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि जलद चौकशी करून हल्ल्यामागील सर्व दोषींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी स्वामी डॉ. सुमनानंद गिरीजी महाराज यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्याची मागणीही करण्यात आली.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा देताना सांगितले की, या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास विश्‍व सनातन धर्म सूर्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. संत-महात्म्यांच्या सुरक्षेच्या प्रश्‍नावर कोणतीही तडजोड केली जाणार नसून, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *