आकाश पुंडकर यांच्या पुतळा दहनाचा इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील बांधकाम व इतर कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे कामगारांवर मोठा अन्याय होत असल्याचा आरोप लोकशाही बांधकाम कामगार व इतर कामगार संघटना (महाराष्ट्र राज्य) यांनी केला आहे. विशेषतः कामगारांच्या मुलांसाठी देण्यात येणारी शैक्षणिक शिष्यवृत्ती बंद करण्यात आल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होणार असल्याचा दावा संघटनेने केला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ येत्या 3 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारमंत्री आकाश पुंडकर यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव भैलुमे यांनी दिला.
यासंदर्भात संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य सरकारला निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात कामगारांच्या हिताच्या योजनांमध्ये करण्यात आलेले बदल तातडीने मागे घेऊन पूर्वीप्रमाणे सर्व योजना सुरू ठेवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी मिळणारी शिष्यवृत्ती बंद झाल्यामुळे अनेक गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडणार आहे. शिक्षणासाठी लागणारा खर्च उचलणे अनेक कामगारांना शक्य होणार नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे हा निर्णय कामगारांच्या मुलांच्या भवितव्याशी खेळणारा असून तातडीने रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
संघटनेने असा आरोपही केला आहे की, कामगारमंत्री आकाश पुंडकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कामगारांसाठीच्या विविध योजनांवर नवीन अटी व निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक पात्र कामगारांना योजनांचा लाभ मिळणे कठीण झाले असून शासनाच्या निर्णयांमुळे कामगारांवर अन्याय होत आहे. कामगारांच्या सामाजिक आणि शैक्षणिक हिताला बाधा पोहोचविणारे हे शासन निर्णय त्वरित मागे घेऊन कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
या मागण्यांकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष दिले नाही, तर 3 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारमंत्री आकाश पुंडकर यांच्या पुतळ्याचे दहन करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा लोकशाही बांधकाम कामगार व इतर कामगार संघटना (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने देण्यात आला आहे.
