माध्यमिक शिक्षक संघ व अहिल्यानगर मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर समन्वय समितीचे निदर्शने
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशातील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे संरक्षण करण्याच्या मागण्यांसाठी दिल्लीच्या जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला माध्यमिक शिक्षक संघ आणि अहिल्यानगर मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर समन्वय समितीने जाहीर पाठिंबा दर्शविला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनाच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी शिक्षण क्षेत्रातील अनियमितता, स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला कथित खेळ आणि शिक्षकांवर वाढणाऱ्या अशैक्षणिक कामांच्या ओझ्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून गेला. केंद्र शासनाने शिक्षण क्षेत्रातील गंभीर प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्यावे, परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक व विश्वासार्ह करावी आणि विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास अबाधित राखण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनात समन्वय समितीचे अध्यक्ष सुनिल पंडित, सचिव आप्पासाहेब शिंदे, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन झगडे, सचिव अमोल ठाणगे, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, सोपानराव कदम, प्रसाद सामलेटी, मंगेश पालवे, अमोल ठाणगे, वैभव सांगळे, तौसिफ शेख, रविंद्र पायमोडे, गोवर्धन पांडुळे, राहुल झावरे, प्रकाश पोटे, फारूक रंगरेज यांच्यासह विविध शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्र शासनाला देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, दिल्लीच्या जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, विविध विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी आणि युवक संघटनांचे प्रतिनिधी आमरण उपोषण करीत असून, या आंदोलनातील प्रमुख मागण्या देशातील शिक्षण व्यवस्थेशी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहेत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि गुणवत्तेला प्राधान्य मिळावे, हा या आंदोलनामागील मुख्य उद्देश असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
गेल्या काही वर्षांत NEET, TET तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये कथित पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता आणि पारदर्शकतेच्या अभावामुळे लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांनी अनेक वर्षे परिश्रम करून दिलेल्या परीक्षांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने त्यांच्या मानसिकतेवर आणि भवितव्यावर गंभीर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या सर्व प्रकरणांची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच या प्रकरणांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.
याचबरोबर शालेय शिक्षकांवर SIR, BLO, जनगणना, निवडणुका तसेच विविध अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा टाकला जात असल्याबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अशा कामांमुळे शिक्षकांचा अध्यापनासाठी मिळणारा मौल्यवान वेळ कमी होत असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. शिक्षकांचा वेळ केवळ अध्यापन, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकास आणि शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी वापरला गेला पाहिजे, हीच शिक्षण व्यवस्थेची अपेक्षा असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाशी नैतिक एकात्मता व्यक्त करण्यात आली असून, केंद्र शासनाने आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करून परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर कराव्यात, विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी तातडीने आवश्यक निर्णय घ्यावेत आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक व दीर्घकालीन सुधारणा कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. या सर्व मागण्यांचे सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भारत सरकारकडे पाठविण्यात आले आहे.

