• Fri. Jul 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

रात्रशाळेतील जिद्दी विद्यार्थ्यांना यशवंती मराठा महिला मंडळाचा ज्ञानाचा आधार

ByMirror

Jul 3, 2026
भाई सथ्था नाईट हायस्कूल मधील अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तक संचांचे वाटप

भाई सथ्था नाईट हायस्कूल मधील अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तक संचांचे वाटप


यशवंती मराठा महिला मंडळाने राबविलेला उपक्रम स्वर्गीय प्रा. शिरीष मोडक यांना खरी श्रध्दांजली -डॉ. पारस कोठारी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आर्थिक, सामाजिक तसेच कौटुंबिक अडचणींवर मात करत दिवसा काम करून उदरनिर्वाह आणि रात्री शिक्षण घेण्याचा संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देण्यासाठी यशवंती मराठा महिला मंडळाने पुढाकार घेतला. हिंद सेवा मंडळाच्या भाई सथ्था नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील अकरावी व बारावीच्या कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना पुस्तक संचांचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला मदत करण्यात आली.


रात्रशाळेत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान चेअरमन डॉ. पारस कोठारी होते. यावेळी नगरसेविका गीतांजली काळे, यशवंती मराठा महिला मंडळाच्या शहराध्यक्ष मीराताई बारस्कर, संस्थापक अध्यक्षा मायाताई कोल्हे, प्राचार्य सुनील सुसरे, माजी मुख्याध्यापिका निर्मला भंडारी तसेच महिला मंडळाच्या मीराताई बेरड, संगीताताई दरेकर, अपर्णा शेलार, कल्पनाताई भंडारी, वैष्णवीताई बारस्कर, वर्षा लगड, मंगलाताई देशमुख, अनिता मोरे, मंगलताई शिरसाठ, लताताई भापकर, वैशाली थोरात, राजश्री शेळके, आशाताई शिंदे, विद्याताई काळे, मेधाताई झावरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या प्रारंभी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष स्वर्गीय प्रा. शिरीष मोडक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या समर्पित कार्याचा यावेळी उपस्थितांनी भावपूर्ण शब्दांत गौरव केला. प्रास्ताविकात प्राचार्य सुनील सुसरे यांनी रात्रशाळेतील विद्यार्थ्यांचा संघर्ष अधोरेखित करत सांगितले की, अनेक विद्यार्थी दिवसभर नोकरी, व्यवसाय अथवा मजुरी करून रात्री शिक्षणासाठी वर्गात येतात. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण पूर्ण करण्याची त्यांची जिद्द प्रेरणादायी आहे. अशा विद्यार्थ्यांना आवश्‍यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी यशवंती मराठा महिला मंडळाने पुढाकार घेतला असून, हा उपक्रम समाजासाठी आदर्शवत आहे. समाजातील विविध संस्था अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या तर अनेकांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.


नगरसेविका गीतांजली काळे म्हणाल्या की, यशवंती मराठा महिला मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. यंदा रात्रशाळेतील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन पुस्तक संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, हा मंडळाचा कायमचा प्रयत्न आहे. शिक्षण हीच खरी समाजपरिवर्तनाची गुरुकिल्ली असून, प्रत्येक सक्षम नागरिकाने आपल्या परीने शिक्षणासाठी योगदान दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.


यशवंती मराठा महिला मंडळाच्या शहराध्यक्ष मीराताई बारस्कर म्हणाल्या की, रात्रशाळेतील विद्यार्थ्यांचा संघर्ष पाहिल्यानंतर त्यांना मदत करण्याचा निर्णय महिला मंडळाने घेतला. दिवसा कष्ट आणि रात्री अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा ओळखून अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविले जातील. समाजातील प्रत्येक घटकाने शिक्षणासाठी हातभार लावला तर अनेक कुटुंबांचे भविष्य बदलू शकते, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


संस्थापक अध्यक्षा मायाताई कोल्हे म्हणाल्या की, शिक्षणामुळेच व्यक्तीचे जीवन बदलते आणि समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा शिक्षणाची वाट धरली, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हे समाजाचे कर्तव्य असून, त्यांच्या यशात समाजाचाही वाटा असावा, या भावनेतून पुस्तक संच वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करून उच्च शिक्षण घेऊन समाजात आदर्श निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले.


अध्यक्षीय समारोपात डॉ. पारस कोठारी म्हणाले की, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष स्वर्गीय प्रा. शिरीष मोडक यांनी आयुष्यभर गरजू, होतकरू आणि वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सातत्याने कार्य केले. शिक्षणासाठी आर्थिक मदत, शैक्षणिक साहित्य तसेच प्रोत्साहन देण्याची त्यांची परंपरा होती. यशवंती मराठा महिला मंडळाने राबविलेला हा उपक्रम म्हणजे त्यांच्या कार्याला आणि विचारांना वाहिलेली खरी श्रद्धांजली आहे. रात्रशाळा ही केवळ शिक्षणाची संस्था नसून नव्याने आयुष्य घडविण्याचे व्यासपीठ आहे. येथे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मविश्‍वास, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन करून समाजासमोर आदर्श निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले.


यावेळी विद्यार्थ्यांना अकरावी व बारावीच्या कला व वाणिज्य शाखेचे पुस्तक संच वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली साताळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्वाती होले यांनी मानले. या उपक्रमाचे संस्थेचे कार्याध्यक्ष सुमतीलाल कोठारी, मानद सचिव संजय जोशी, ज्येष्ठ मार्गदर्शक ब्रिजलालजी सारडा, अजितशेठ बोरा व सर्व कार्यकारिणी सदस्य, शालेय समिती सदस्यांनी अभिनंदन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *