चांदबिबी महालाची सहल घडवून केले वृक्षारोपण
हरदिनचे उपक्रम गरजू विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास व उमेद निर्माण करणारे -ॲड. सचिन जगताप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा संगम घडवून आणणारा हरदिन मॉर्निंग ग्रुपचा 26 वा स्नेहमेळावा ऐतिहासिक चांदबिबी महाल परिसरात उत्साहात पार पडला. या स्नेहमेळाव्यानिमित्त वीरभद्र आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी निसर्गरम्य आणि ऐतिहासिक चांदबिबी महाल परिसराची शैक्षणिक सहल घडविण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
विशेष म्हणजे, शासनाचे कोणतेही अनुदान नसलेल्या वीरभद्र आश्रम शाळेत ग्रामीण व गरजू कुटुंबांतील मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या उद्देशाने हरदिन मॉर्निंग ग्रुपने हा सामाजिक उपक्रम राबविला. तसेच यावेळी ग्रुपच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांसह स्वच्छता अभियान राबविले. कार्यक्रमादरम्यान चांदबिबी महाल परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. “एक सदस्य एक वृक्ष” या संकल्पनेतून प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष ॲड. सचिन जगताप, शहर बँकेचे व्हाईस चेअरमन प्रा. माणिक विधाते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच सीए रवींद्र कटारिया, अभिजीत खोसे, सचिन चोपडा, राजू चंगेडिया, जयराम मेहतानी, चुनीलाल झंवर, हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, प्रांजली सपकाळ, जयश्रीताई पोटे, संगीता सपकाळ, मनीषा शिंदे, वैशाली वराट, सारिका पवार, सुनीता बनकर, ॲड. मनीषा बेरड, जहीर सय्यद, सर्वेश सपकाळ, अशोक पराते, दिलीप ठोकळ, ताराचंद ठोकळ, सचिन पेंढुरकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, विलास आहेर, प्रल्हादराव बनकर, सुनील गुरव, सुभाष पेंढुरकर, सचिन कर्डिले, बाळासाहेब बेरड, ईवान सपकाळ, आशाताई पराते, उषाताई ठोकळ, शााहिन सय्यद, चंद्रकला पालवे, अभिजीत सपकाळ, वीरभद्र आश्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. मिलिंद फुंदे, मुख्याध्यापक प्रकाश शिंदे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी ग्रुपच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, “सशक्त समाज घडविण्याचा पाया शिक्षणात आहे. त्यामुळे पर्यावरण आणि आरोग्य चळवळीबरोबरच गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सातत्याने मदतीचा हात पुढे करणे ही हरदिन मॉर्निंग ग्रुपची परंपरा आहे. विद्यार्थ्यांना आनंदी वातावरणात शिक्षणाची प्रेरणा मिळावी म्हणून ऐतिहासिक व निसर्गरम्य स्थळाची सहल आयोजित करून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रत्येक सदस्य आपला वाढदिवस वृक्षारोपण करून आणि त्या वृक्षाचे संवर्धन करून साजरा करतो. हीच खरी समाजाप्रती आपली बांधिलकी असल्याचे त्यांनी सांगितले.
सचिन चोपडा यांनी सांगितले की, “हा ग्रुपचा 26 वा स्नेहमेळावा असून प्रत्येक सदस्य समाजोपयोगी कार्यात सक्रिय सहभाग घेत आहे. वीरभद्र आश्रम शाळेच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. याशिवाय भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कचा कायापालट करण्याचे कार्यही ग्रुपने केले आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या विकास निधीतून योग भवन उभारण्यात आले असून उद्यानाच्या पुढील विकासासाठीही सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत.”
ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “समाजपरिवर्तनाचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे शिक्षण. गरजू विद्यार्थ्यांना मदत करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य हरदिन मॉर्निंग ग्रुप करत आहे. समाजाचे आणि निसर्गाचे आपण देणे लागतो, ही भावना जपून कार्य करणाऱ्या प्रत्येक सदस्याला या कार्याचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जयश्री पोटे म्हणाल्या की, “शिक्षण हे वाघिणीचे दूध असून ते पिणारा प्रत्येकजण अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद मिळवतो. आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संस्कारमय शिक्षण दिले जाते. अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपने हाती घेतलेला उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
ॲड. सचिन जगताप म्हणाले की, “समाजात सकारात्मक बदल घडवून आणायचा असेल तर शिक्षण आणि सामाजिक संवेदनशीलता यांचा संगम आवश्यक आहे. हरदिन मॉर्निंग ग्रुपने केवळ शैक्षणिक साहित्य वाटप केले नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास, प्रेरणा आणि मोठी स्वप्ने पाहण्याची उमेद निर्माण केली आहे. पर्यावरण संवर्धन, आरोग्य जनजागृती आणि शिक्षण या तिन्ही क्षेत्रांत सातत्याने कार्य करणाऱ्या या ग्रुपचे कार्य इतरांसाठी आदर्शवत आहे. समाजातील प्रत्येक सक्षम व्यक्तीने अशा उपक्रमांमध्ये योगदान दिल्यास अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, “शिक्षण हीच समाजाच्या विकासाची खरी गुरुकिल्ली आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. हरदिन मॉर्निंग ग्रुपने समाजोपयोगी उपक्रमातून शिक्षण आणि पर्यावरण यांचा सुंदर मेळ घालून सामाजिक जाणीव जागृत केली आहे. आज वृक्षारोपण करून भविष्यातील पिढीसाठी हिरवाईचा वारसा निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला आहे. अशा विधायक कार्यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गर्जे यांनी केले. उपस्थितांचे आभार सर्वेश सपकाळ यांनी मानले.

