• Fri. Jun 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

सीए (डॉ.) प्रा. शंकर अंदानी यांची कोल्हापूरच्या अखिल भारतीय संवाद परिषदेच्या अध्यक्षपदी निवड

ByMirror

Jun 26, 2026
‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती दिनी संवाद परिषद’

‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती दिनी संवाद परिषद’


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राजर्षी शाहू महाराज यांच्या 152 व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज पहिले अखिल भारतीय संवाद परिषद’च्या अध्यक्षपदी साहित्य, समाजकारण आणि लेखा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अहिल्यानगरचे सुपुत्र सीए (डॉ.) प्रा. शंकर घनशामदास अंदानी यांची निवड करण्यात आली आहे.
शुक्रवार, दि. 26 जून रोजी कोल्हापूर येथील दसरा चौकातील मोहामेडन एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात हा भव्य सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. गंगाधर कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात ‘लोकराजा राजर्षी शाहू पुरस्कार-2026’ वितरण समारंभाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पद्मश्री उदय देशपांडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


परिषदेत राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्य, सामाजिक सुधारणा, शिक्षणविषयक धोरणे आणि समतावादी विचारसरणीवर विविध तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. परिषदेचे संयोजक कमलाकर वर्टेकर यांनी ही माहिती दिली.
सीए (डॉ.) प्रा. शंकर अंदानी यांनी मराठी आणि हिंदी साहित्य क्षेत्रात केलेल्या भरीव कार्यामुळे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. साहित्य क्षेत्रात त्यांनी अनेक अभूतपूर्व विक्रमांची नोंद केली असून एकाच दिवशी तब्बल 106 स्वलिखित पुस्तकांचे प्रकाशन करण्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहे.


याशिवाय ‘आई’ या विषयावर आधारित 5,121 कवितांचा जगातील सर्वात मोठा हिंदी काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा मानही त्यांनी मिळविला आहे. आजवर त्यांनी लिहिलेल्या 12 हजार 100 हून अधिक कवितांचे विविध ग्रंथांमधून प्रकाशन झाले असून या कार्याची स्वतंत्र जागतिक विक्रम म्हणून नोंद करण्यात आली आहे. मराठी साहित्याला नवे आयाम देत त्यांनी ‘वडील : बाबा अबोल जीवनाचे कोडे’ या शीर्षकाखाली महाराष्ट्रातील 80 कवींच्या 1,161 कवितांचे संकलन करून भव्य काव्यसंग्रह प्रकाशित केला. तसेच ‘बहिण माझी प्रिय ताई’ या नावाने बहिणीवरील 1,161 कवितांचे स्वतंत्र संकलन प्रकाशित करून कौटुंबिक नातेसंबंधांवरील साहित्याला नवी दिशा दिली आहे.


अंदानी यांच्या या विक्रमी साहित्यिक कार्याची दखल लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्ससारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली आहे. त्यांच्या नावावर विविध जागतिक विक्रमांची नोंद करण्यात आली असून साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव जगभरात झाला आहे. साहित्य क्षेत्राबरोबरच समाजसेवेतही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंदिरे, मस्जिद, चर्च, धर्मशाळा तसेच विविध सामाजिक संस्थांना अत्यल्प मानधनात किंवा विनामूल्य लेखा व करसल्लागार सेवा देऊन त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. वर्ष 2022 मध्ये तब्बल 364 धार्मिक व सामाजिक संस्थांचे आर्थिक आणि करसल्लागार कामकाज सांभाळल्याबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्यांची स्वतंत्र विक्रम नोंद केली होती.


व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेले सीए शंकर अंदानी यांनी श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथे सलग 18 वर्षे करसल्लागार म्हणून सेवा बजावली आहे. तसेच अहिल्यानगर महानगरपालिका, विविध शासकीय संस्था, बँका, पतसंस्था आणि सामाजिक संघटनांचे लेखापरीक्षक व करसल्लागार म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. साहित्य, समाजसेवा आणि व्यावसायिक क्षेत्रातील त्यांच्या बहुआयामी कार्याचा गौरव म्हणून ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज पहिले अखिल भारतीय संवाद परिषद’च्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *