• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

शिक्षणमहर्षी कै. गुरुवर्य बत्तिन यांची 138 वी जयंती उत्साहात साजरी

ByMirror

Jun 20, 2026
विद्यार्थ्यांना शिक्षणातून प्रगतीचा संदेश; ग्रंथालयासाठी पुस्तक मदतीची घोषणा

विद्यार्थ्यांना शिक्षणातून प्रगतीचा संदेश; ग्रंथालयासाठी पुस्तक मदतीची घोषणा


पद्मशाली समाजाच्या उन्नतीसाठी गुरुवर्य बत्तिन यांचे योगदान प्रेरणादायी -नारायण मंगलारम


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पद्मशाली समाजात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करून सामाजिक जागृतीची चळवळ उभारणारे पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक कै. गुरुवर्य बत्तिन यांची 138 वी जयंती शहरातील गांधी मैदान परिसरातील प्रा. बत्तिन पोट्यन्ना प्राथमिक विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित अभिवादन सोहळ्यात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांनी कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.


कार्यक्रमाच्या प्रारंभी कै. गुरुवर्य बत्तिन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संघटनात्मक कार्याचा आढावा घेत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला. समाजातील वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची आठवण यावेळी करण्यात आली.

या अभिवादन सोहळ्यास गुरुवर्य पोट्यन्ना बत्तीन शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठानचे नूतन अध्यक्ष नारायण मंगलारम, उपाध्यक्ष सदाशिव बत्तीन, कार्याध्यक्ष ज्ञानेश्‍वर मंगलारम, मावळते अध्यक्ष बाळकृष्ण सिद्धम, मावळते सचिव बाळकृष्ण गोटीपामुल, प्रा. वीरभद्र बत्तीन, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव संदुपटला, मुख्याध्यापक श्रीनिवास मुत्त्याल, रावसाहेब इंगळे, शोभा बडगू, अनंता गाली, आरती नक्का यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना नारायण मंगलारम यांनी कै. गुरुवर्य बत्तिन यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे, हा संदेश त्यांनी आपल्या कार्यातून दिला. पद्मशाली समाजाला संघटित करून शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. आजच्या स्पर्धात्मक युगात युवक-युवतींनी उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत प्रगती साधणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी नमूद केले.


उपाध्यक्ष सदाशिव बत्तीन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, कै. गुरुवर्य बत्तिन यांचे विचार आणि कार्य आजही समाजाला प्रेरणा देणारे आहे. समाजसेवेचे व्रत स्वीकारून त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले. त्यांच्या प्रयत्नांमुळे शहरात आणि परिसरात पद्मशाली समाजाची शैक्षणिक व सामाजिक वाटचाल अधिक सक्षम झाली. त्यांच्या कार्याचा आदर्श नव्या पिढीने घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


या प्रसंगी सदाशिव बत्तीन यांनी विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. तर नारायण मंगलारम यांनी विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्‍यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कै. गुरुवर्य बत्तिन यांच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे, मनोगते आणि विचार सादर केले. त्यांच्या जीवनातील संघर्ष, समाजासाठी केलेले कार्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदान यावर विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे प्रकाश टाकला.


कै. गुरुवर्य बत्तिन यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला स्वाभिमान, प्रगती आणि संघटनशक्तीची दिशा दिली. त्यांनी रुजविलेल्या शैक्षणिक मूल्यांमुळे अनेक विद्यार्थी घडले असून आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यामुळे समाजात शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला, याची आठवण उपस्थितांनी यावेळी करून दिली. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *