जीएनडी ग्रुपचा मानवतेचा संदेश
गुरु अर्जुन देवजींचे बलिदान आजही समाजासाठी प्रेरणादायी -आ. संग्राम जगताप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शीख धर्माचे पाचवे गुरु तथा मानवतेचे उपासक गुरु अर्जुन देवजी यांच्या शहिदी दिनानिमित्त तारकपूर परिसरात गुरु नानक देवजी (जीएनडी) ग्रुपच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यानिमित्त नागरिकांसाठी लंगर (प्रसाद) तसेच थंडगार सरबताचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते प्रसाद वाटप करून करण्यात आला.
शहिदी दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात गुरु अर्जुन देवजी यांच्या कार्याचा आणि बलिदानाचा गौरवपूर्ण स्मरण करण्यात आले. शीख धर्मातील सेवा, समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. यावेळी जनक आहुजा, नगरसेविका हरप्रीतकौर गंभीर, जीतू गंभीर, अजिंक्य बोरकर, जय भोसले, गजेंद्र भांडवलकर, मनीष खुराणा, अमन खुराणा, संजय आहुजा, करन आहुजा, बल्लू सचदेव, बबलू खोसला, किशोर कंत्रोड, गौरव कंत्रोड, गुनीत कंत्रोड, सागर कुमार, मनोज मनोचा, रोहित बत्रा, मॉन्टी तलवार, गिरीश खन्ना, विनीत कंत्रोड, गोलू गंभीर, खुश कंडुजा यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी गुरु अर्जुन देवजी यांच्या जीवनकार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, गुरु अर्जुन देवजी हे मानवतेचे खरे सेवक आणि धर्माचे निष्ठावान रक्षक होते. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात समाजसेवा, अध्यात्म आणि लोककल्याणासाठी कार्य केले. अन्याय, अत्याचार आणि दडपशाहीसमोर कधीही न झुकता त्यांनी आपल्या धर्मनिष्ठेचे पालन केले. अमानुष छळ सहन करूनही त्यांनी धर्माचा त्याग केला नाही. शीख धर्मासाठी ते शहीद होवून इतिहासात अजरामर झाले. त्यांच्या हौतात्म्यामुळे शीख धर्माच्या इतिहासाला नवे वळण मिळाले आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा समाजाला मिळाली. आजही त्यांचे जीवन आणि बलिदान समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात जनक आहुजा यांनीही गुरु अर्जुन देवजी यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, गुरु अर्जुन देवजी यांनी अमृतसर येथील गुरु रामदास सरोवराचे काम पूर्णत्वास नेले. तसेच शीख धर्माचा पवित्र ग्रंथ असलेल्या गुरु ग्रंथ साहिब यांच्या संकलनाचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी पूर्ण केले. समाजात आध्यात्मिक जागृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले. त्यांच्या विचारांचा प्रभाव वाढत असल्याने तत्कालीन मुघल सत्तेला तो खटकला. परिणामी त्यांना अमानुष छळाला सामोरे जावे लागले. मात्र धर्म आणि सत्याच्या मार्गावरून न ढळता त्यांनी शहिदी स्वीकारली. त्यांच्या त्यागामुळे धर्मनिष्ठा, सहनशीलता आणि मानवतेचा आदर्श समाजासमोर उभा राहिला, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरु अर्जुन देवजी यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

