फिनिक्स फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम; मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियांमुळे ज्येष्ठांच्या आयुष्यात उजेड
महापुरुषांच्या विचारातून समाजसेवा-जालिंदर बोरुडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनानिमित्त समाजातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ज्येष्ठ नागरिकांना नवदृष्टी देण्याचा अनोखा सामाजिक उपक्रम फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आला. नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिराच्या माध्यमातून 48 ज्येष्ठ नागरिकांवर पुणे येथे यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर नवदृष्टी मिळालेले ज्येष्ठ नागरिक राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनी अहिल्यानगरात परतले आणि त्यांनी जिजाऊंना अभिवादन करत त्यांच्या कार्याचा जयघोष केला.
शहरात परतल्यानंतर या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी स्वागत केले. यावेळी शस्त्रक्रियेनंतर प्रथमच स्पष्टपणे पाहण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत फिनिक्स फाऊंडेशनने त्यांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणल्याची भावना व्यक्त केली.
फिनिक्स सोशल फाऊंडेशनने समाजसेवेचा वेगळा आदर्श निर्माण करत महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी सामाजिक कार्यातून साजऱ्या करण्याची परंपरा जोपासली आहे. राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनी उपेक्षित, गरजू आणि दृष्टीदोष असलेल्या नागरिकांना नवदृष्टी देऊन त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. समाजातील दुर्लक्षित घटकांना आधार देण्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
फाऊंडेशनच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरामध्ये शेकडो रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यातून मोतीबिंदूची समस्या असलेल्या 48 ज्येष्ठ नागरिकांची निवड करण्यात आली. त्यानंतर पुणे येथील के. के. आय बुधराणी रुग्णालयात त्यांच्यावर पूर्णपणे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. प्रवास, तपासणी, शस्त्रक्रिया आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा या सर्व सेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्या.
याबाबत बोलताना फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी सांगितले की, आर्थिक दुर्बल घटकांतील अनेक नागरिक केवळ आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहतात. विशेषतः मोतीबिंदूसारख्या आजारामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांचे दैनंदिन जीवन कठीण होते. अशा गरजू नागरिकांना पुन्हा दृष्टी मिळवून देण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनने जिल्हाभर दृष्टीदानाची मोठी चळवळ उभी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी प्रेरणा दिली. रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी दिलेले संस्कार आणि समाजहिताचा विचार आजही प्रेरणादायी आहे. त्याच विचारांचा वारसा घेऊन फिनिक्स फाऊंडेशन समाजातील उपेक्षित आणि गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबवत आहे.
फाऊंडेशनच्या माध्यमातून दर महिन्याला मोफत नेत्र तपासणी शिबिरे आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात येते. याशिवाय नेत्रदान आणि अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष मोहिमाही राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळत असून समाजात आरोग्यविषयक जागरूकता निर्माण होत आहे. राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनी 48 ज्येष्ठ नागरिकांना नवदृष्टी मिळाल्याने हा दिवस त्यांच्या आयुष्यात अविस्मरणीय ठरला.

