बालकामगारमुक्त समाज निर्मितीसाठी सर्व घटकांनी योगदान द्यावे -आ. संग्राम जगताप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक बालकामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून अहिल्यानगर शहरात बालकामगार प्रथा निर्मूलन व बालहक्क संरक्षणाबाबत व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानाचे प्रारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते माहिती पत्रकाचे अनावरण करुन करण्यात आले. या अभियानाचे आयोजन कामगार विभाग, चाईल्ड लाईन, विपला फाउंडेशन तसेच विविध शासकीय विभागांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
जागतिक बालकामगार विरोधी दिन हा बालकांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणे आणि बालशोषणाविरुद्ध समाजात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी नागरिक, प्रवासी, कर्मचारी व अधिकारी यांच्यामध्ये जनजागृती करण्यात आली.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, बालकामगारमुक्त समाज निर्मितीसाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. तसेच बालकांचे शिक्षण, आरोग्य, सुरक्षा आणि सर्वांगीण विकास यासाठी समाजातील प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारण्याचे त्यांनी आवाहन केले.
या उपक्रमाची सुरुवात अहिल्यानगर रेल्वे स्थानक परिसरातून करण्यात आली. यावेळी कामगार विभागाचे अधिकारी, लोहमार्ग पोलीस, चाईल्ड लाईनचे प्रतिनिधी तसेच विपला फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. रेल्वे स्थानकावर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना बालकामगार प्रथेचे दुष्परिणाम, बालकांचे कायदेशीर हक्क, बालमजुरी रोखण्यासाठी नागरिकांची भूमिका याबाबत माहिती देण्यात आली. तसेच बालकामगार आढळून आल्यास संबंधित यंत्रणांना तत्काळ कळविण्याचे आवाहन करण्यात आले.
यानंतर पुणे बसस्थानक परिसरात बस नियंत्रण कक्षातील कर्मचारी, वाहतूक कर्मचारी, प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या सहभागातून जनजागृती करण्यात आली. बसस्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी अनेक वेळा बालमजुरी, बालशोषण व बालतस्करीची प्रकरणे आढळून येतात. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन उपस्थितांना करण्यात आले.
याशिवाय अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या उपस्थितीत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. बालकामगार, बालशोषण व बालसुरक्षेसंदर्भातील कायदेशीर तरतुदींबाबत माहिती देण्यात आली. पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून बालहक्क संरक्षणासाठी प्रभावी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
बाल कल्याण समिती, अहिल्यानगर येथे समितीचे अध्यक्ष ओहोळ यांच्या समवेत जनजागृती करण्यात आली. बालकांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या विविध यंत्रणांच्या भूमिकेबाबत माहिती देण्यात आली. बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम यांच्या उपस्थितीतही जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली तसेच बालहक्कांच्या संरक्षणासाठी शासन व स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांचे महत्त्व सांगण्यात आले.
या सर्व कार्यक्रमांद्वारे “बालपण शिक्षणासाठी आहे, कामासाठी नाही”, “बालकामगारमुक्त भारत हीच खरी प्रगती” आणि “प्रत्येक बालकाला शिक्षण, संरक्षण व सन्मानाचा हक्क” असे संदेश देण्यात आले. नागरिकांनी बालकामगार प्रथा रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा, बालहक्कांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित यंत्रणांना माहिती द्यावी आणि बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या अभियानात कामगार विभाग, चाईल्ड लाईन, विपला फाउंडेशन, लोहमार्ग पोलीस, कोतवाली पोलीस स्टेशन, बाल कल्याण समिती, महिला व बाल विकास विभाग तसेच विविध क्षेत्रांतील अधिकारी, कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

