अल्बोस टेक्नॉलॉजीने घेतली शैक्षणिक कार्याची दखल गौरव; ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते होणार गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पुणे येथील अल्बोस टेक्नॉलॉजी यांच्या सौजन्याने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नागापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चाँद हुसेन शेख यांना महाराष्ट्र भूषण 2026 पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुणे येथे दि. 20 जून रोजी होणाऱ्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे संयोजक रोहित गांधी यांनी दिली. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी साहित्यिक सीए (डॉ.) प्रा. शंकर अंदानी, सिने अभिनेत्री माधुरी पवार, सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, आशू सुरपूर, संदिप रासकर आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
चाँद हुसेन शेख यांनी शिक्षक म्हणून कार्यरत असताना अनेक विद्यार्थ्यांना घडवून त्यांना उज्ज्वल भविष्याची दिशा दिली आहे. शिक्षणाबरोबरच त्यांनी सामाजिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे ते उत्कृष्ट पोवाडा गायक असून सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्याचे कार्यही त्यांनी केले आहे. त्यांनी ज्या-ज्या ठिकाणी शिक्षक म्हणून सेवा बजावली, त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या लोकसहभागातून शाळांच्या इमारती उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. किन्ही (पारनेर), दरेवाडी (नगर), हिवरेझरे (नगर), कनोली (संगमनेर), नाचनगाव (अकोले) आणि नवनागापूर (नगर) येथील शाळांच्या इमारतींची कामे त्यांनी यशस्वीरीत्या मार्गी लावली आहेत. या कार्याची दखल घेऊन त्यांना सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

