• Sat. Jun 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

पै. नाना डोंगरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

ByMirror

Jun 12, 2026
राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू घडविण्याचा निर्धार; पैलवान नाना डोंगरे यांचा पुढाकार

अल्बोस टेक्नॉलॉजीच्या वतीने होणार सामाजिक कार्याचा गौरव; ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची उपस्थिती


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पुणे येथील अल्बोस टेक्नॉलॉजी यांच्या सौजन्याने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना महाराष्ट्र भूषण 2026 पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुणे येथे दि. 20 जून रोजी होणाऱ्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे संयोजक रोहित गांधी यांनी दिली. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी साहित्यिक सीए (डॉ.) प्रा. शंकर अंदानी, सिने अभिनेत्री माधुरी पवार, आशू सुरपूर, संदिप रासकर आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.


स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असलेले पै. नाना डोंगरे यांनी नगर तालुक्यासह जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रमांद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागात सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य आणि धार्मिक क्षेत्रात त्यांनी सातत्यपूर्ण व प्रभावी कार्य उभारले आहे. संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी अनेक विधायक उपक्रम राबविण्यात आले आहेत.
पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन मोहिमा, स्त्री जन्माचे स्वागत, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, मतदार जनजागृती, जलसंधारण जनजागृती, रक्तदान शिबिरे अशा विविध सामाजिक उपक्रमांद्वारे त्यांनी समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न केला आहे. युवकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. तसेच गावपातळीवर आरोग्य शिबिरांचे आयोजन करून ग्रामीण नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे कार्यही सातत्याने सुरू आहे.


महिला बचत गट मेळावे, युवा संमेलने, विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातून ग्रामीण समाजाला नवी दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. साहित्य क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते. ग्रामीण भागातील नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी आठ राज्यस्तरीय काव्य संमेलने तसेच सहा ग्रामीण मराठी साहित्य संमेलने यशस्वीपणे आयोजित केली आहेत. त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र भूषण जाहीर करण्यात आल्याचे आयोजकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डोफ्लगरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *