• Thu. Aug 27th, 2026

Mirrornews24

Marathi News

ज्येष्ठ महिलांनी तयार करावी ‘उर्वरित आयुष्याची बकेट लिस्ट’; डॉ. श्‍यामा मंत्री यांचे मार्गदर्शन

ByMirror

Jun 7, 2026
शारीरिक, मानसिक व भावनिक फिटनेसच सुखी वार्धक्याची गुरुकिल्ली -डॉ. श्‍यामा मंत्री

प्रयास नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम; ज्येष्ठ महिलांना निरोगी, आनंदी आणि अर्थपूर्ण जीवनासाठी व्याख्यान


शारीरिक, मानसिक व भावनिक फिटनेसच सुखी वार्धक्याची गुरुकिल्ली -डॉ. श्‍यामा मंत्री

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ज्येष्ठ महिलांचे आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि आनंदी जीवनशैली यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने प्रयास नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ महिलांमध्ये वाढत्या वयाबरोबर निर्माण होणारे विविध आरोग्यविषयक प्रश्‍न, मानसिक तणाव आणि भावनिक आव्हाने याबाबत जागृती घडवून आणण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला.


या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. श्‍यामा मंत्री उपस्थित होत्या. त्यांनी ‘उर्वरित आयुष्याची बकेट लिस्ट’ या विषयावर अत्यंत प्रेरणादायी आणि जीवनाला नवी दिशा देणारे मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका रूपाली निखिल वारे, राजस्थानी महिला मंडळाच्या सल्लागार पुष्पा मणियार, सरस्वती झंवर, दादी-नानीच्या उपाध्यक्षा सुचेता बोरकर, लता आंबेकर, दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, प्रयास ग्रुपच्या अध्यक्ष रजनी भंडारी, संस्थापक अध्यक्ष अलकाताई मुंदडा, सचिव हिरा शहापुरे, खजिनदार मेघना मुनोत, ॲड. स्वाती जाधव, सुपर्णा देशमुख, वैशाली क्षीरसागर, उषा सोनी, छाया भंडारी, अरुणा गोयल, कविता शिंगवी, ॲड. ज्योत्स्ना कुलकर्णी, सुजाता कदम, अलका वाघ, सुनिता काळे, सोनाली थोरात, सुरेखा जंगम, हेमा पडोळे, नीलिमा पवार, उषा सोनटक्के, शशिकला झरेकर, जयश्री पुरोहित, सोनी पुरनाळे, लीला अग्रवाल, रेखा फिरोदिया, आशा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होत्या.


मार्गदर्शन करताना डॉ. श्‍यामा मंत्री म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वेळ ही सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. एकदा निघून गेलेला वेळ परत मिळत नाही. त्यामुळे आयुष्याच्या उत्तरार्धात किंवा निवृत्तीनंतर वेळ कसा घालवायचा याचा सकारात्मक विचार करणे आवश्‍यक आहे. अनेक महिला आयुष्यभर कुटुंब, मुलं, नोकरी, व्यवसाय आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळण्यात व्यस्त असतात. मात्र, आयुष्याच्या या टप्प्यावर स्वतःसाठी जगण्याची, स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्याची आणि आनंद शोधण्याची गरज आहे.


त्या पुढे म्हणाल्या की, प्रत्येक ज्येष्ठ महिलेने स्वतःची ‘बकेट लिस्ट’ तयार करावी. आयुष्यात करायच्या राहिलेल्या गोष्टी, पूर्ण करायची स्वप्ने, शिकायची कला, भेट द्यायची ठिकाणे, समाजासाठी करायची कामे आणि स्वतःच्या आनंदासाठी आवश्‍यक असलेल्या गोष्टींची यादी तयार करून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आयुष्याबद्दल सकारात्मकता निर्माण होते आणि जगण्याची उमेद कायम राहते.


डॉ. मंत्री यांनी ज्येष्ठ महिलांच्या आरोग्याविषयी बोलताना सांगितले की, वाढत्या वयात केवळ शारीरिक आरोग्य चांगले असणे पुरेसे नाही, तर मानसिक आणि भावनिक स्वास्थ्यही तितकेच महत्त्वाचे आहे. नियमित व्यायाम, चालणे, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि आरोग्य तपासणी यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. परंतु मन आनंदी आणि स्थिर राहण्यासाठी सकारात्मक विचार, छंद जोपासणे, मित्रपरिवाराशी संवाद ठेवणे आणि समाजात सक्रिय राहणे गरजेचे आहे.


त्या म्हणाल्या की, अनेक वेळा एकटेपणा, अपेक्षाभंग, कौटुंबिक बदल किंवा आरोग्याच्या समस्या यामुळे ज्येष्ठ नागरिक भावनिकदृष्ट्या खचून जातात. अशा परिस्थितीत स्वतःला सावरणे आणि भावनिकदृष्ट्या सक्षम बनविणे आवश्‍यक आहे. जीवनात समस्या येणारच, मात्र त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिल्यास त्यावर सहज मात करता येते. भावनांचा योग्य ठिकाणी आणि विचारपूर्वक वापर केल्यास नातेसंबंध अधिक दृढ होतात आणि मानसिक तणाव कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जयाताई गायकवाड यांनी दादी-नानी ग्रुपच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरण, आरोग्य जनजागृती, व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत अलकाताई मुंदडा यांनी केले.


कार्यक्रमात महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक तसेच बौद्धिक खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विजेत्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करून त्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले, तर आभार ॲड. स्वाती जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उज्वला मालू आणि दीपा सोनी यांनी विशेष परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *