• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

आभा कार्ड असूनही शिक्षक कॅशलेस उपचारांपासून वंचित

ByMirror

May 30, 2026
खासगी रुग्णालयांमध्ये तात्काळ सुविधा लागू करण्याची मागणी

शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन


खासगी रुग्णालयांमध्ये तात्काळ सुविधा लागू करण्याची मागणी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत “आभा (ABHA) कार्ड” काढत असले तरी प्रत्यक्षात खासगी रुग्णालयांमध्ये त्यांना कॅशलेस उपचार सुविधा मिळत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवेदन पाठविले असून, या संदर्भात त्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.


शिक्षण संचालनालयाच्या निर्देशानुसार राज्यातील 100 टक्के अनुदानित खासगी शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आभा कार्ड काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह असला तरी प्रत्यक्ष उपचाराच्या वेळी अनेक खासगी रुग्णालयांकडून शिक्षकांना कॅशलेस सुविधा नाकारली जात असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे की, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समाज घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत असताना गंभीर आजार, अपघात किंवा वैद्यकीय संकटाच्या वेळी त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक शिक्षकांना लाखो रुपयांचा वैद्यकीय खर्च करावा लागत असून शासनाच्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याने ही योजना केवळ कागदोपत्री राहण्याची भीती निर्माण झाली आहे.


प्रसाद शिंदे यांनी शासनाकडे राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आयुष्यमान भारत योजनेत पूर्ण समावेश करण्याची मागणी केली आहे. तसेच सर्व खासगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार सुविधा बंधनकारक करण्यात यावी, आभा कार्डधारक शिक्षकांना उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि जिल्हास्तरावर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.


यासोबतच, “जोपर्यंत सर्वसमावेशक योजना पूर्णपणे कार्यान्वित होत नाही, तोपर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पूर्वीप्रमाणे वैद्यकीय बिले स्वीकारण्यात यावीत,” ही प्रमुख मागणीही प्रसाद शिंदे यांनी निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे. या विषयावर लवकरच नाशिक शिक्षक मतदार संघाचे आमदार किशोर दराडे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *