मुस्लिम युवकांकडून गोशाळेत चारा वाटप; धार्मिक सौहार्दाचा अनोखा संदेश
गाईला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करण्याची मागणी; “द्वेष नव्हे, एकात्मतेची गरज” असल्याचा संदेश
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बकरी ईद (ईद-उल-अजहा) या पवित्र सणानिमित्त शहरात धार्मिक एकात्मता, सामाजिक सलोखा आणि मानवतेचा अनोखा संदेश देणारा उपक्रम गुरुवारी (दि. 28 मे) पार पडला. मुस्लिम समाजातील युवकांनी ईदच्या नमाजनंतर थेट गोशाळेत जाऊन गार्इंना चारा वाटप करत समाजासमोर बंधुभावाचे एक वेगळे उदाहरण उभे केले. या उपक्रमामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, “धर्म वेगळे असले तरी माणुसकी एकच असते,” हा संदेश देण्यात आला.
कुष्ठधाम रोड, बारस्कर मळा येथील सतनाम साक्षी गोशाळेत आय लव्ह अहमदनगर फाऊंडेशनच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ईदच्या आनंदात सहभागी होत मुस्लिम युवकांनी गोमातेला चारा अर्पण करून धार्मिक एकात्मतेची भावना जपली. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष साहेबान जहागीरदार, मौलाना शफिक कासमी, नगरसेवक हाजी शैबाज, शैबाज बॉक्सर, शहानवाज शेख, फिरोज पठाण, फिरोज आर्किटेक, तनवीर तांबोळी, आयान शेख, मुजम्मिल शेख, शाहिद मोमीन, जीशान शेख, साहिल सय्यद यांच्यासह गोशाळेचे सचिव सीए शंकर अंदानी, मुकेश माधवाणी आणि अनेक युवक उपस्थित होते.
ईदसारख्या धार्मिक सणाच्या दिवशी मुस्लिम समाजातील युवक गोशाळेत चारा घेऊन पोहोचल्याने उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले. समाजात अनेकदा अफवा आणि गैरसमजांच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असताना, या उपक्रमाने मात्र हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जिवंत उदाहरण समोर आणले. भारत हा कृषीप्रधान देश असून गाईला येथे विशेष धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर गाईला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करण्यात यावे, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने नुकतीच जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्या मागणीला अधिक बळ देण्यासाठी ईदच्या दिवशी गोशाळेत चारा वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना साहेबान जहागीरदार म्हणाले की, “राज्य सरकारने लागू केलेल्या गोहत्या बंदीच्या नियमांचे पालन मुस्लिम समाज पूर्ण जबाबदारीने करत आहे. संपूर्ण देशभरात मुस्लिम समाजाने गावंश जनावरांची कुर्बानी केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. गाय ही हिंदू बांधवांच्या श्रद्धेचा विषय असून कृषी संस्कृतीचेही प्रतीक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने गाईला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करण्याचा गंभीरपणे विचार करावा.”
ते पुढे म्हणाले की, “गोहत्या किंवा गाईच्या नावावरून मुस्लिम समाजाविषयी चुकीचे समज निर्माण करण्याचे प्रकार थांबले पाहिजेत. अफवा पसरवून दोन समाजांमध्ये द्वेष निर्माण करण्यापेक्षा एकात्मता, प्रेम आणि परस्पर आदर वाढविण्यासाठी समाजाने पुढे येण्याची गरज आहे. हिंदू-मुस्लिम समाज एकत्र राहिला तरच देश अधिक मजबूत होईल.”
मौलाना शफिक कासमी यांनीही ईदच्या दिवशी पार पडलेल्या या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, इस्लाम धर्म मानवतेचा, दयाळूपणाचा आणि सहअस्तित्वाचा संदेश देतो. समाजात शांतता आणि बंधुभाव टिकवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे शहरात धार्मिक सलोखा आणि सामाजिक ऐक्याचा सकारात्मक संदेश पोहोचला असून, अनेक नागरिकांनी या पुढाकाराचे स्वागत केले आहे.
