• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

माध्यमिक शिक्षक संघाची शिक्षण आयुक्तांसोबत बैठक; शिक्षकांच्या प्रश्‍नांवर चर्चा

ByMirror

May 24, 2026
25 मे पर्यंत प्रश्‍न न सोडवल्यास आयुक्तांसमोर तीव्र आंदोलन -आ. सत्यजित तांबे

25 मे पर्यंत प्रश्‍न न सोडवल्यास आयुक्तांसमोर तीव्र आंदोलन -आ. सत्यजित तांबे


पुणे येथे शिक्षण आयुक्तांसोबत शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्‍नांवर सकारात्मक चर्चा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्या उपस्थितीत तसेच मा. आमदार सत्यजित तांबे, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर आणि शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांच्यासोबत पुणे येथे नुकतेच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस नाशिक विभागातील सर्व शिक्षणाधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
या बैठकीत महाराष्ट्र शिक्षक संघटनेच्या वतीने एस. डी. भिरुड, राज्य फेडरेशन संघाचे कोषाध्यक्ष राजेंद्र लांडे, शिक्षक नेते तसेच चेअरमन आप्पासाहेब शिंदे, दिलीप काटे तसेच अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन झगडे, सेक्रेटरी अमोल ठाणगे व दिपक दरेकर यांनी सहभाग घेतला.


बैठकीमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्‍नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये शिक्षकांचे रखडलेले वेतन, संच मान्यता, दप्तर दिरंगाई, शालार्थ मान्यता, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक मान्यता, डी.एड.-बी.एड. प्रमोशन मान्यता, अकरावी प्रवेश प्रक्रिया, समायोजन, शालार्थ आयडी तसेच विविध प्रशासकीय कामांमध्ये होणारी अडवणूक आदी महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता.


तसेच बैठकीमध्ये अंशतः अनुदानित शिक्षकांचे नियमित वेतन, शालार्थ आयडी प्रकरणे, संच मान्यतेतील त्रुटी, शिक्षक भरती प्रक्रियेतील अडचणी, रोस्टर तपासणी, समायोजन, टीईटी अट, डीसीपीएस प्रकरणे, पर्यवेक्षक व मुख्याध्यापक मान्यता, टप्पा अनुदान, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन, प्राथमिक व माध्यमिक विभागातील प्रलंबित विषय, अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, पवित्र पोर्टलमधील तांत्रिक त्रुटी तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील शिक्षकांच्या प्रश्‍नांवरही सकारात्मक चर्चा करण्यात आली. संघटनेने शिक्षण विभागासमोर विविध मागण्यांचे निवेदन सादर करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.


संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाकडे विविध प्रलंबित विषय तत्काळ मार्गी लावण्याची मागणी केली. शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्‍नांमुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात अडचणीत असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी शिक्षण आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांनी प्रश्‍नांबाबत सकारात्मक भूमिका घेत लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, प्रलंबित प्रश्‍नांचे तातडीने निराकरण न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *