• Fri. May 22nd, 2026

कौटुंबिक वादाच्या सुनावणीसाठी नगरमध्ये आलेल्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला

ByMirror

May 21, 2026

आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी; जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन


आरोपी मोकाट फिरत असल्याने जीवाला धोका

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- न्यायप्रविष्ट असलेल्या कौटुंबिक वादाच्या न्यायालयीन कामासाठी अहिल्यानगर शहरात आलेल्या वाशी, नवी मुंबई येथील अजीज अहमद बेग खान यांच्यावर कथितरीत्या जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा अजीज खान यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी त्यांनी केली आहे.


अजीज अहमद बेग खान यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांची सासरवाडी अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात असून, कौटुंबिक वादासंदर्भातील प्रकरण सध्या नगर न्यायालयात सुरू आहे. संबंधित प्रकरणाच्या सुनावणीसाठी ते नगरमध्ये आले असताना त्यांच्यावर काही व्यक्तींनी अचानक हल्ला करून गंभीर मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत होऊन हात फ्रॅक्चर झाला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.


या घटनेप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलम 118 (2), 118 (1), 115 (2), 351 (2) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही मुख्य आरोपी हुसेन खान, आजम खान व इतर संबंधित आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप अजीज खान यांनी केला आहे. आरोपी खुलेआम फिरत असून त्यांच्याकडून जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. पोलिसांनी योग्य ती कार्यवाही न केल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा अजीज अहमद बेग खान यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *