• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

राम-केवट भेटीतून समतेचा संदेश -ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे

ByMirror

May 20, 2026
राम-केवट भेटीतून समतेचा संदेश -ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे

हरिहरेश्‍वर मंदिरात रामकथेचा भक्तिमय सोहळा उत्साहात; हजारो भाविकांची उपस्थिती


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तपोवन, सूर्यनगर येथील हरिहरेश्‍वर मंदिर येथे ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे (आळंदी) यांच्या मधुर वाणीतून आयोजित श्रीराम कथा व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सात दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यासाठी परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थित राहून रामभक्तीचा लाभ घेतला.


कथे दरम्यान महाराजांनी प्रभू श्रीराम आणि केवट यांच्या भेटीचा प्रसंग अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत उलगडला. गंगेच्या पलीकडे प्रभू श्रीरामांना नावेतून पोहोचविणारा केवट हा भिल्ल समाजातील होता. मात्र प्रभू श्रीरामांनी त्याच्या जाती-पातीचा विचार न करता त्याला प्रेम, सन्मान आणि आपलेपण दिले. यामधून भगवान रामांनी समता, मानवता आणि भक्ती श्रेष्ठ असल्याचा संदेश दिल्याचे महाराजांनी सांगितले.


प्रभू श्रीरामांनी मोबदला म्हणून अंगठी देऊ केली असता केवटाने नम्रपणे नकार दिला. “प्रभू, माझा आणि तुमचा धंदा एकच आहे. तुम्ही संसाररूपी भवसागरातून लोकांना तारता, तर मी नदीतून लोकांना पार नेतो. मला कोणताही मोबदला नको, फक्त हा हात धरला तो कधी सोडू नका,” असे केवटाने भावपूर्ण शब्दांत सांगितल्याचे वर्णन करताच अनेक भाविक भावूक झाले. “वनवास संपवून परत येताना मला विसरू नका, माझ्याच नावेतून प्रवास करा,” ही केवटाची विनवणी भक्तांच्या मनाला स्पर्शून गेली.


यावेळी महाराजांनी राजा दशरथांच्या दुःखद प्रसंगाचेही अत्यंत भावनिक वर्णन केले. प्रभू श्रीरामांना वनवासाला जावे लागल्याची बातमी ऐकताच दशरथ पूर्णपणे खचून गेले. पुत्रवियोगाच्या वेदनेत असताना त्यांना तरुणपणी घडलेली श्रावण बाळाची घटना आठवली. चुकून श्रावण बाळाचा बाण लागून मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंध आई-वडिलांनी दिलेला शाप “जसा आम्हाला पुत्रवियोग सहन करावा लागत आहे, तसाच मृत्यू तुलाही पुत्रवियोगाने येईल,” – त्यांच्या मनात घुमू लागला. राम… राम… अशी आर्त हाक देत, डोळ्यांत अश्रू आणि अंतःकरणात असह्य वेदना घेऊन दशरथांनी अखेरचा श्‍वास घेतल्याचे वर्णन ऐकून अनेक भाविकांचे डोळे पाणावले.


महाराजांनी सांगितले की, समाजात कोणताही मनुष्य मोठा किंवा लहान नसतो. भक्ती, प्रामाणिकपणा आणि मानवतेची भावना हाच खरा धर्म आहे. श्रीरामांनी भिल्ल केवटाला दिलेला सन्मान हा सामाजिक समतेचा आदर्श संदेश असल्याचे त्यांनी नमूद केले. रामनामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. संयोजक सूर्यनगर परिसरातील सर्व ग्रामस्थांनी भाविकांसाठी पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, प्रकाश व्यवस्था तसेच शिस्तबद्ध नियोजन करून उत्तम सेवा दिली. त्यामुळे संपूर्ण सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *