हरदिन मॉर्निंग ग्रुपकडून स्वच्छता अभियान व वृक्षारोपण
युवकांनी इतिहासातून प्रेरणा घेत समाजकार्याची दिशा स्वीकारावी -संजय सपकाळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क परिसरात आयोजित कार्यक्रमात स्वच्छता अभियान राबवून वृक्षारोपण करण्यात आले. तर मिठाईवाटप करुन जयंती सोहळ्याचा आनंद व्यक्त करण्यात आला. या जयंती सोहळ्याद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सीए रविंद्र कटारिया आणि डॉ. दमन काशीद यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थितांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून टाकला. यानंतर जॉगिंग पार्क परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नागरिकांनी स्वयंप्रेरणेने सहभाग घेत परिसरातील कचरा हटवून स्वच्छतेचा संदेश दिला. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. सुनील जाधव आणि ताराचंद ठोकळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, अशोक पराते, जहीर सय्यद, रमेश वराडे, सुवेंद्र कटारिया, सचिनशेठ चोपडा, सुनील जाधव, सर्वेश सपकाळ, सुधीर कपाळे, अविनाश पोतदार, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, रतन मेहेत्रे, सचिन परदेशी, विलास आहेर, ताराचंद ठोकळ, दिलीप ठोकळ, दिपकराव घोडके, योगेश चौधरी, अभिजीत सपकाळ, दिलीप गुगळे, मराठा पतसंस्थेचे संचालक अच्युतराव गाडे, गणेश सातकर, नवनाथ वेताळ, इंजि. अनिल सोळसे, निजाम पठाण, नवनाथ खराडे, कुमार धतुरे, सरदारसिंग परदेशी, दिनेश शहापूरकर, दशरथ मुंडे, आनंद राठोड, दीपक अमृत, मेजर विनोद खोत, विशाल भामरे, एकनाथ जगताप, डॉ. गायत्री कुलकर्णी, प्रा. सारिका रघुवंशी, मीनाताई परदेशी आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन हे शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी समाजाने एकत्र येत सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याची गरज आहे. युवकांनी इतिहासातून प्रेरणा घेत समाजकार्याची दिशा स्वीकारावी, असेही त्यांनी नमूद केले.
सचिनशेठ चोपडा म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांनी संकटांचा सामना करत स्वराज्य आणि धर्मरक्षणासाठी दिलेले बलिदान इतिहासात अजरामर आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त केवळ उत्सव न साजरा करता समाजहिताचे उपक्रम राबविणे हीच खरी आदरांजली ठरेल. स्वच्छता आणि वृक्षारोपणासारख्या उपक्रमांतून सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होते, असे त्यांनी सांगितले.
सीए रविंद्र कटारिया म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज हे विद्वत्ता, पराक्रम आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक होते. त्यांच्या कार्यातून युवकांनी प्रेरणा घेऊन समाजासाठी सकारात्मक योगदान देण्याची आवश्यकता आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन हे धर्म, संस्कृती आणि स्वाभिमान जपणारे होते. त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले. त्यांच्या विचारांचे स्मरण करत समाजात ऐक्य, सद्भावना आणि संस्कार टिकविण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे, असे त्यांनी सांगितले.
