• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या 20 दिवसांच्या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

ByMirror

May 5, 2026
प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन आत्मसात करून खेळाडूंनी स्वतःची शारीरिक क्षमता वाढवावी -ज्ञानेश्‍वर खुरंगे

“खो-खो, कबड्डी, कुस्ती आणि बॅडमिंटनसाठी विशेष शिबिर; दोन टप्प्यात विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन


प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन आत्मसात करून खेळाडूंनी स्वतःची शारीरिक क्षमता वाढवावी -ज्ञानेश्‍वर खुरंगे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि नवोदित खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने 20 दिवसांच्या प्राथमिक व अद्ययावत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले.
या प्रसंगी क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, संतोष वाबळे, प्रियंका खिंडरे, सोमनाथ गीताराम राऊत, बाणेश्‍वर क्रीडा मंडळाचे मार्गदर्शक गणेश वारुळे, विश्‍वंभरा प्रतिष्ठान बुऱ्हाणनगरचे रामेश्‍वर चिमटे, श्रीराम कुस्ती केंद्राचे मार्गदर्शक सोमनाथ राऊत तसेच कुस्तीपटू सौरभ मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.


या शिबिरात खो-खो, बॅडमिंटन, कुस्ती आणि कबड्डी या खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार असून शिबिर दोन टप्प्यात आयोजित करण्यात आले आहे. पहिला टप्पा 4 मे ते 13 मे तर दुसरा टप्पा 18 मे ते 27 मे या कालावधीत पार पडणार आहे. जिल्ह्यातील खेळाचा प्रचार व प्रसार वाढवणे, ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना समान संधी देणे आणि गुणवंत खेळाडू घडवणे हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश आहे. या माध्यमातून खेळाडूंच्या शारीरिक व मानसिक क्षमतेचा विकास करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.


ज्ञानेश्‍वर खुरंगे म्हणाले की, जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून आयोजित केलेले हे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर जिल्ह्यातील क्रीडा चळवळीला बळकटी देणारा महत्त्वाचा टप्पा आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शिक्षणाबरोबरच क्रीडाही तितकीच महत्त्वाची आहे. ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता आहे, मात्र योग्य मार्गदर्शन व सुविधा मिळाल्या नाहीत तर ही प्रतिभा दडपून जाते. हेच लक्षात घेऊन आम्ही हे शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरातून खेळाडूंना केवळ खेळाचे तंत्र नव्हे, तर शिस्त, आत्मविश्‍वास आणि संघभावना यांचेही शिक्षण मिळणार आहे. प्रशिक्षकांकडून मिळणारे मार्गदर्शन आत्मसात करून खेळाडूंनी स्वतःची शारीरिक क्षमता वाढवावी आणि उच्च स्तरावर पोहोचण्याचे ध्येय ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले.


शिबिरामध्ये अनुभवी प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन दिले जात आहे. कुस्ती या खेळासाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रवीण कोंढावळे, खो-खो साठी संतोष वाबळे तर बॅडमिंटनसाठी विशाल गर्जे यांनी खेळाडूंना प्रशिक्षण देत क्रीडा क्षेत्रातील संधी, तंत्र आणि फिटनेसबाबत सखोल मार्गदर्शन केले. याशिवाय खेळातील बारकावे शिकवून खेळाडूंना स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित करण्यास प्रोत्साहित करण्यात आले.


शिबिराच्या ठिकाणांमध्ये विविध क्रीडा केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे. खो-खोचे प्रशिक्षण बाणेश्‍वर क्रीडा मंडळ, बुऱ्हाणनगर तसेच आबासाहेब काकडे विद्यालय, निर्मलनगर (शेवगाव) येथे होणार आहे. बॅडमिंटन व कबड्डीचे प्रशिक्षण जिल्हा क्रीडा संकुल, अहिल्यानगर येथे दिले जाणार आहे. तर कुस्तीचे प्रशिक्षण संभाजी राजे कुस्ती केंद्र, सावेडी आणि तालुका क्रीडा संकुल, बुऱ्हाणनगर येथे पार पडणार आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *