• Sat. May 2nd, 2026

भिंगारमध्ये महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

ByMirror

May 1, 2026

कामगारांचा सन्मान, गौतम बुद्धांच्या पुतळ्यास अभिवादन व वृक्षारोपणाचा उपक्रम


करुणा, शांतता आणि एकतेचा संदेश देत सामाजिक सलोखा दृढ करण्याचा संकल्प

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने छावणी परिषदेतील कामगारांचा सत्कार करून त्यांच्या श्रमाचे कौतुक करण्यात आले, तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आले.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्यान परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानंतर बुद्धांच्या पुतळ्यासमोर मेणबत्त्या प्रज्वलित करून त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले आणि सुख, शांती व समृद्धीसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. या कार्यक्रमास छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी प्रमुख उपस्थित होत्या. यावेळी डॉ. दमन काशीद, हरदिन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन चोपडा, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे, सर्वेश व प्रांजली सपकाळ, संगीता सपकाळ, जहीर सय्यद, जैद सय्यद, जियान सय्यद, सोपानराव साळवे, सचिन परदेशी यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.


कार्यक्रमात ईवान सपकाळ यांच्या हस्ते बोधीवृक्षाचे प्रतीक म्हणून पिंपळाच्या झाडांची लागवड करण्यात आली. तसेच संजय भिंगारदिवे, दीपक अमृत आणि रमेश भिंगारदिवे यांनी त्रिशरण व पंचशील घेतले.
मुख्य कार्यकारी अधिकारी विजयवंशी यांच्या हस्ते छावणी परिषदेतील कामगार गणेश भोर, दीपक अमृत, रमेशराव वराडे, ताराचंद ठोकळ, अशोकराव पराते, अनिलराव हळगावकर, राजेश तेजी आणि संजय मोरकरोसे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच योग भवनासाठी शशिकांत पवार यांनी घड्याळ भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली.


डॉ. दमन काशीद म्हणाले की, “भगवान गौतम बुद्ध यांनी जगाला करुणा, क्षमा आणि शांततेचा अमूल्य संदेश दिला आहे. आजच्या तणावपूर्ण आणि धावपळीच्या जीवनात हा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो. बुद्धांनी दाखवलेला सत्य, अहिंसा हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात प्रकाश देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.


सचिन चोपडा म्हणाले की, महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे. संतांच्या विचारांमुळे समाजात समता आणि बंधुभाव निर्माण झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांनी दिलेले बलिदान आपल्याला एकतेचे महत्त्व शिकवते. आज आपण जात-धर्माच्या भेदांपलीकडे जाऊन समाजाच्या प्रगतीसाठी काम करणे हीच खरी त्यांना आदरांजली असल्याचे सांगितले.
संजय सपकाळ म्हणाले की,“संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही आपल्या इतिहासातील प्रेरणादायी घटना आहे. त्या चळवळीमुळेच आजचा महाराष्ट्र घडला आहे. विकासाची पायाभरणी ही त्याच संघर्षातून झाली असल्याचे त्यांनी सांगितले.


ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज अनावडे म्हणाले की, वृक्षारोपण हा केवळ पर्यावरणाचा नव्हे, तर अध्यात्मिकदृष्ट्याही महत्त्वाचा उपक्रम आहे. भगवान बुद्धांना बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले, त्यामुळे वृक्षांचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. आज आपण कामगारांचा सन्मान केला, यामुळे त्यांच्या श्रमाला योग्य प्रतिष्ठा मिळाली आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान केला तरच खऱ्या अर्थाने समताधिष्ठित समाज निर्माण होणार असल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *