• Thu. Apr 30th, 2026

नर्मदा-गोदावरी नदीजोड प्रकल्प अशक्य; ‘रेन गेन बॅटरी’च खरा पर्याय

ByMirror

Apr 29, 2026

पीपल्स हेल्पलार्इनचा दावा; प्रचंड खर्च, भौगोलिक अडचणी आणि पर्यावरणीय धोके अधोरेखित


“नदी वळवू नका, पाणी जमिनीत वळवा!” -ॲड. कारभारी गवळी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नर्मदा आणि गोदावरी नद्यांना जोडण्याची संकल्पना अनेक वर्षांपासून चर्चेत असली, तरी ती प्रत्यक्षात अशक्य, अव्यवहार्य आणि पर्यावरणदृष्ट्या धोकादायक असल्याचा दावा पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आला आहे. त्याऐवजी “रेन गेन बॅटरी” ही पावसाचे पाणी जमिनीत मुरविणारी वैज्ञानिक पद्धतच महाराष्ट्रासाठी जलक्रांती घडवू शकते, असे मत व्यक्त करण्यात आले.


ॲड. कारभारी गवळी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, नर्मदा नदी पश्‍चिमेकडे तर गोदावरी नदी पूर्वेकडे वाहते. या दोन नद्यांच्या मध्ये सातपुडा आणि विंध्य पर्वतरांगा असल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह शक्य नाही. त्यामुळे प्रचंड पंपिंग, कृत्रिम उचल व्यवस्था आणि मोठ्या प्रमाणावर कालवे व बोगदे उभारावे लागतील. या प्रकल्पासाठी अंदाजे ₹3 ते ₹5 लाख कोटी खर्च अपेक्षित असून, त्यासोबतच सततचा वीजखर्चही मोठा असेल. त्यामुळे हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही.
याशिवाय मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये पाण्याच्या हक्कावरून मोठे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

“अतिरिक्त पाणी” ही संकल्पनाही वास्तवात वादग्रस्त ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले. पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही हा प्रकल्प गंभीर परिणाम घडवू शकतो. मोठ्या प्रमाणावर जंगलतोड, जैवविविधतेचे नुकसान आणि हजारो लोकांचे विस्थापन होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नर्मदा-गोदावरी नदीजोड प्रकल्प व्यवहारात अशक्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले.


याउलट “रेन गेन बॅटरी” ही पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविणारी प्रभावी आणि कमी खर्चिक पद्धत असल्याचे सांगण्यात आले. या तंत्रामुळे झाडांच्या मुळांजवळ वर्षभर ओलावा टिकून राहतो, भूजल पुनर्भरण होते आणि शेतीसाठी आवश्‍यक पाणी उपलब्ध राहते.

या पद्धतीचे प्रमुख फायदे म्हणजे अत्यल्प खर्च आणि शून्य वीज वापर, भूजल पातळीत सातत्याने वाढ, दुष्काळावर दीर्घकालीन उपाय, पर्यावरणपूरक आणि टिकाऊ विकास असणार आहे. जर नर्मदा-गोदावरी प्रकल्पासाठी लागणारा प्रचंड निधी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतात “रेन गेन बॅटरी” उभारण्यासाठी वापरला, तर संपूर्ण राज्य सिंचनसंपन्न होऊ शकते, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला.


नर्मदा-गोदावरी जलयात्रा ही धार्मिक दृष्टिकोनातून योग्य असली, तरी प्रत्यक्षात त्यातून पाण्याचा प्रश्‍न सुटणार नाही. “नदी जोडण्याऐवजी प्रत्येक थेंब जमिनीत साठवणे अधिक गरजेचे आहे,” यासाठी असा “नदी वळवू नका, पाणी जमिनीत वळवा!” जलसंवर्धनाचा नवा मंत्र महाराष्ट्राच्या जलभविष्यासाठी संदेश देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *