“भावनिक गुलामगिरीविरोधात जनजागृती”; पीपल्स हेल्पलाईनचा ‘नॉन जेनेटिक इनफॉरमेशन’ अभियान सुरू
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नसल्याचा इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजात धर्माच्या नावाखाली निर्माण होणाऱ्या भावनिक वातावरणाचा गैरफायदा घेत सर्वसामान्यांना दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत, या प्रवृत्तीविरोधात जनजागृती करण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने ‘नॉन जेनेटिक इनफॉरमेशन’ या संकल्पनेवर आधारित अभियान सुरू करण्यात आले आहे. तर देशात लोकशाही गुंडाळून भोंदूशाही आणली जात असल्याचा आरोप करुन, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नसल्याचा इशारा ॲड. कारभारी गवळी यांनी संघटनेच्या वतीने दिला आहे.
या अभियानाच्या माध्यमातून धर्म आणि अंधश्रद्धा यांमधील स्पष्ट फरक नागरिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. “समजा, तपासा आणि सुधार करा!” ही घोषणा देत नागरिकांनी कोणतीही गोष्ट आंधळेपणाने स्वीकारण्याऐवजी तिचा विचारपूर्वक अभ्यास करावा, असा संदेश देण्यात आला आहे.
ॲड. गवळी यांनी सांगितले की, देशाची वाटचाल वैज्ञानिक दृष्टिकोनाऐवजी अंधश्रद्धा आणि भावनिकतेकडे होत असल्याची चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. विज्ञानाधारित विचारसरणी रुजवण्यासाठी आणि समाजात विवेक जागृत करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.
त्यांनी पुढे नमूद केले की, “नॉन जेनेटिक इनफॉरमेशन” या संकल्पनेद्वारे मानवी विचारसरणी आणि वर्तनावर प्रभाव टाकण्याचे विविध मार्ग तयार झाले आहेत. गेल्या काही शतकांत धार्मिक आणि सामाजिक संकल्पना या केवळ श्रद्धेपुरत्या मर्यादित न राहता, काही ठिकाणी लोकांच्या भावना नियंत्रित करण्याचे साधन बनल्या आहेत. भीती, ओळख (जात, धर्म) आणि स्वार्थ यांच्या आधारे समाजात भावनिक नियंत्रणाचे जाळे निर्माण होते. त्यामुळे लोक स्वतंत्रपणे विचार करण्याऐवजी ठरवून दिलेल्या चौकटीत अडकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इतिहासाच्या संदर्भातही त्यांनी चिंता व्यक्त केली. इतिहासाचे विकृतीकरण होत असून, अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे कार्य राजकीय सोयीप्रमाणे वेगळ्या पद्धतीने मांडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे सर्वसामान्य जनतेच्या सहभागातून उभे राहिले होते, याची जाणीव समाजाला करून देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
भावनिक कथा आणि संदेशांची सातत्याने पुनरावृत्ती केल्याने लोक प्रश्न विचारणे थांबवतात आणि कालांतराने असत्य गोष्टीही सत्य म्हणून स्वीकारल्या जातात, असे निरीक्षणही यावेळी नोंदविण्यात आले. या पार्श्वभूमीवर, लोकशाही व्यवस्थेत विचारपूर्वक मतदानाचे महत्त्व अधोरेखित करत ॲड. गवळी यांनी इशारा दिला की, “जेव्हा निर्णय विचाराऐवजी भावनेवर घेतले जातात, तेव्हा लोकशाही कमकुवत होते.”
खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर केवळ राजकीय स्वातंत्र्य पुरेसे नसून, मानसिक आणि बौद्धिक गुलामगिरीतूनही मुक्तता आवश्यक आहे. या उद्देशानेच हे जनजागृती अभियान राबविण्यात येत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या अभियानासाठी अशोक सब्बन, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हु सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीर बहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे, ॲड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले, प्रकाश गोसावी आदी प्रयत्नशील आहेत.
