• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

रेशनकार्ड, ऑनलाइन प्रक्रिया आणि गॅस पुरवठा गतिशील करा -रामदास फुले

ByMirror

Apr 17, 2026
अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांना निवेदन

अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांना निवेदन


रेशनकार्डची कामे रखडल्यामुळे गोरगरीब धान्यापासून वंचित

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गोरगरीब व वंचित नागरिकांना शासनाच्या शिधा धान्याचा नियमित लाभ मिळावा, यासाठी रेशनकार्ड व ऑनलाईन प्रक्रियेमधील अडथळे तात्काळ दूर करून ती प्रक्रिया गतीमान व पारदर्शक करावी, तसेच जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही वितरणात होत असलेल्या गोंधळावर नियंत्रण आणून व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मंत्री भुजबळ शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आले असता रामदास फुले यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हे निवेदन दिले. यावेळी त्यांनी पुरवठा विभागातील विविध त्रुटींकडे लक्ष वेधत सामान्य नागरिकांना भेडसावत असलेल्या अडचणींचा सविस्तर आढावा मांडला.


निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अहिल्यानगर जिल्ह्यासह तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांची रेशनकार्ड नोंदणी अद्याप पूर्ण झालेली नाही. काही नागरिकांच्या रेशनकार्डवर धान्य वितरण रखडलेले असून, अनेकांना त्यांचा हक्काचा शिधा वेळेवर मिळत नाही. रेशनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असून, अर्ज महिनोमहिने प्रलंबित राहतात. परिणामी, नागरिकांना खासगी एजंटकडे जावे लागते, अन्यथा त्यांचे काम मार्गी लागत नाही. या परिस्थितीमुळे गोरगरीब व गरजू कुटुंबांना अन्नधान्यापासून वंचित राहावे लागत असल्याची गंभीर बाब फुले यांनी अधोरेखित केली आहे.


तसेच, संबंधित यंत्रणांनी रेशनकार्ड व ऑनलाईन प्रक्रियेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक, सुलभ आणि वेगवान करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. प्रक्रिया गतिमान झाल्यास धान्य वितरणातील अडचणी कमी होऊन लाभार्थ्यांना वेळेवर शिधा मिळू शकेल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला.


दरम्यान, गॅस वितरणाच्या प्रश्‍नाकडेही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले आहे. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस तुटवड्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, प्रशासनाकडून जिल्ह्यात मुबलक साठा उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात गॅस एजन्सीकडून वितरणात गोंधळ होत असून, नागरिकांना वेळेवर सिलिंडर मिळण्यात अडचणी येत आहेत. या विरोधाभासी परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम व नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर गॅस वितरण व्यवस्था नियोजनबद्ध करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही फुले यांनी केली आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, माजी महापौर भगवान फुलसौंदर ,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते नागेश गवळी, प्रदेश चिटणीस अंबादास गारुडकर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, कार्याध्यक्ष अभिषेक चिपाडे, समता परिषदेचे महानगर जिल्हा अध्यक्ष ब्रिजेश ताठे, प्रसाद भडके, देवेंद्र दुधाले, विश्वास शिंदे, शरद जाधव, अनुराग पडोळे, अभय पडोळे, शुभम आव्हाड, स्वप्निल राऊत, निखिल ताठे, विशाल सुडके, अमृत क्षीरसागर, गणेश पडोळे व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *