• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

शाळांची पटपडताळणी पुढे ढकलण्याची शिक्षक सेनेची मागणी

ByMirror

Apr 9, 2026
शिक्षक सेनेच्या जिल्हा अध्यक्षपदी प्रसाद शिंदे यांची नियुक्ती

परीक्षा व प्रशासकीय कामांच्या ताणामुळे शिक्षकांमध्ये नाराजी; 11, 15 व 22 एप्रिलच्या नियोजित पटपडताळणीवर पुनर्विचार व्हावा


ऑनलाईन संच मान्यतेद्वारे पदांची निश्‍चिती व समायोजन सुरू असताना प्रत्यक्ष पटपडताळणीची आवश्‍यकता काय,? -प्रसाद शिंदे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील शाळांची पटपडताळणी प्रक्रिया पुढे ढकलावी अथवा पूर्णपणे रद्द करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शालेय शिक्षण मंत्र्यांना निवेदन पाठवले आहे.


निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, राज्यातील शाळांमध्ये दि. 11, 15 आणि 22 एप्रिल 2026 रोजी पटपडताळणी आयोजित करण्यात आली आहे. मात्र, याच कालावधीत इयत्ता 2री इयत्ता 9 वी व 11 वीच्या परीक्षा सुरू असून इतर शैक्षणिक उपक्रमही सुरू आहेत. त्यामुळे शाळांच्या नियमित शैक्षणिक कामकाजावर याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


राज्यातील बहुतांश शाळांनी त्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक आधीच निश्‍चित केले असून काही ठिकाणी पुढील इयत्तांसाठी जादा तासांचे नियोजनही करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत अचानक येणाऱ्या पटपडताळणीमुळे शाळांच्या नियोजनात अडथळे निर्माण होत असल्याची बाब शिक्षक सेनेने स्पष्ट केले आहे.


याशिवाय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर सध्या विविध अशैक्षणिक जबाबदाऱ्यांचा ताण मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये बीएलअो म्हणून मतदार यादी अद्ययावत करणे, निवडणूक संबंधित कामे, टीइटी परीक्षा तयारी, जनगणना कामे, शासनाच्या विविध सर्वेक्षणांची अंमलबजावणी, तसेच ऑनलाईन नोंदी व माहिती भरणे अशा अनेक जबाबदाऱ्या समाविष्ट आहेत. या सर्व कामांमुळे शिक्षक आधीच व्यस्त असून, त्यात पटपडताळणीची भर पडल्यास अडचणी वाढणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.


शासनाकडून ऑनलाईन संच मान्यतेद्वारे पदांची निश्‍चिती व समायोजन प्रक्रिया सुरू असताना प्रत्यक्ष पटपडताळणीची आवश्‍यकता काय,? असा प्रश्‍नही प्रसाद शिंदे यांनी उपस्थित केला आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून राज्यातील शाळांची पटपडताळणी प्रक्रिया पुढे ढकलावी किंवा संबंधित आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी शिक्षक व शिक्षकेतर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *