• Wed. Apr 1st, 2026

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; सेवानिवृत्त सभासदांना कृतज्ञता निधीचे वाटप

ByMirror

Apr 1, 2026

शहरात मुलींच्या हॉस्टेलसाठी जागा देणार -महापौर ज्योतीताई गाडे

काटकसरी व पारदर्शक कारभारातून आदर्श सोसायटी उभारण्याचा सर्व संचालकांचा निर्धार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षक हे समाजाला दिशा देणारे असून सक्षम पिढी घडविण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करतात. त्यांच्या कार्याची कृतज्ञता शब्दांत व्यक्त होऊ शकत नाही, असे प्रतिपादन महापौर ज्योतीताई गाडे यांनी केले. शिक्षकांमध्ये काटकसरीचा गुण असून, संचालक मंडळही त्याच पद्धतीने संस्थेचा कारभार करत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मुलींसाठी हॉस्टेल उभारण्यासाठी महापालिकेमार्फत सोसायटीला जागा उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.


अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ आणि सेवानिवृत्त सभासदांचा कृतज्ञता सोहळा नगर-कल्याण रोडवरील जाधव लॉन्स येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या सोहळ्यास उपमहापौर धनंजय जाधव, चेअरमन आप्पासाहेब शिंदे, व्हाईस चेअरमन अर्जुन वाळके, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, संचालक बाबासाहेब बोडखे, सुनील दानवे, महेंद्र हिंगे, सुरज घाटविसावे, वैशाली दारकुंडे, वर्षा खिलारी, विजय पठारे, अतुल कोताडे, बाजीराव अनभुले, शिवाजी लवांडे, छबू फुंदे, साहेबराव रक्टे, आप्पासाहेब जगताप, ईश्‍वर धुमाळ, संभाजी गाडे, बाळाजी गायकवाड, सुधीर कानवडे, राजेंद्र कोतकर, उमेश गुंजाळ, सोसायटीचे सचिव स्वप्निल इथापे यांच्यासह प्रा. सुनिल पंडित, भाऊसाहेब रोहोकले, विलास साठे, नंदकुमार शितोळे, शिरीष टेकाडे, सुभाष कडलग, मारुती लांडगे, उत्तम राजळे, अमोल ठाणगे, अमोद नलगे, राहुल झावरे, सुभाष भागवत, गुलाब गाडेकर, सत्यवान थोरे आदींसह सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रास्ताविकात बाबासाहेब बोडखे यांनी सांगितले की, 25 वर्षांनंतर सोसायटीत सत्तांतर झाले असून नवीन संचालक मंडळाचा हा पहिला कृतज्ञता सोहळा आहे. संस्थेची ‘अ’ वर्ग ऑडिट श्रेणी, 10,784 सभासद आणि 975 कोटी रुपयांचे कर्जवाटप झालेले आहे. संस्थेचा विकास व सभासद हितासाठी सर्व संचालक योगदान देत आहे. जिल्हा बँकेत 250 कोटींची सीसी मंजूर असून ती 100 कोटींवर आणली आहे.


निवडणुकीपूर्वी दिलेल्या शब्दाप्रमाणे साडे सहा हजार रुपयांचा थकित कृतज्ञता निधी सेवानिवृत्त सभासदांना देण्यात येत आहे. तसेच सभासदांच्या मुलांसाठी मोफत अभ्यासिका सुरू करून यूपीएससी व एमपीएससीसाठी तज्ञ मार्गदर्शन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पारदर्शक व काटकसरी कारभारातून राज्यात आदर्श सोसायटी उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


चेअरमन आप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले की, सत्तेत आल्यानंतर ट्रॉफी, कॅलेंडर, मंगल कार्यालय आदी खर्चात लाखो रुपयांची बचत करण्यात आली. 25 वर्षांनंतर सत्तांतर घडवून आणत सभासदांनी दाखविलेल्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही, तसेच कोणतीही योजना बंद केली जाणार नाही. शहीद जवानाच्या वारसाला 1 लाख रुपयांची मदत, दिवंगत सभासदांची कर्जमाफी व ठेवी परत देणे, पाल्यांच्या लग्नासाठी 15 हजार रुपये देणे असे उपक्रम राबविले जात आहेत. मुख्य शाखेत एमपीएससी मार्गदर्शन केंद्र आणि जूनपासून प्रत्येक शाखेत अभ्यासिका सुरू करण्याचा मानस आहे. महापालिकेकडून भूखंड मिळाल्यास मुलींसाठी हॉस्टेल व शिक्षक भवन उभारण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.


उपमहापौर धनंजय जाधव यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत मुलींच्या हॉस्टेलसाठी भूखंड देण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. सुनील पंडित यांनी संचालक मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. गुणवंत विद्यार्थिनी वैष्णवी व्यवहारे व वेदिका शेळके यांनी या सन्मानामुळे प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. सुभाष कडलग यांनी सोसायटीचा परिपूर्ण कारभार कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. तसेच सोसायटी स्वयंपूर्ण व्हावी व ठेव सुरक्षित राहावी यासाठी सभासदांनी ठेवी येथेच ठेवाव्यात, असे आवाहन केले.


माजी प्राचार्य खासेराव शितोळे यांनी पारदर्शक कारभार कायम ठेवण्याचे आवाहन केले. सेवानिवृत्त सभासद उत्तम राजळे व सखाराम गारुडकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीशचंद्र दळवी यांनी केले तर आभार सुरज घाटविसावे यांनी मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *