वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बोल्हेगाव येथील जगदंबा प्रतिष्ठान संचलित मीराज इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. धर्मादाय आयुक्त निरीक्षक ज्योती सकट यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच अष्टपैलू यशाचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील चिमुकल्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सोहळ्याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या संचालिका सौ. मीरा बारस्कर, नगरसेविका आशाताई कातोरे, ह्युमन राईट्स नॅशनल ऑब्झर्व्हर सौ. शोभा कानडे, तायक्वांदो प्रशिक्षक सुरेश वाघ, ॲबकस शिक्षिका जयश्री गाडे, उपप्राचार्या सौ. अर्चना गुंड तसेच को-ऑर्डिनेटर सौ. प्रीती शिंदे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना संचालिका सौ. मीरा बारस्कर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून खेळ, संस्कार आणि व्यक्तिमत्व विकास यांची जोड अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी नमूद केले. संचालिका सौ. मीरा बारस्कर यांनी मीराज इंटरनॅशनल स्कूलच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची व दोन्ही शाखेबद्दल माहिती दिली.
धर्मादाय आयुक्त निरीक्षक ज्योती सकट यांनी आपल्या मार्गदर्शनातून शाळेच्या उपक्रमांचे आणि पारदर्शक व्यवस्थापनाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचा संदेश दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात मोठे यश मिळवण्यासाठी सातत्य, मेहनत आणि शिस्त या मूल्यांचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या मुख्य सत्रात वर्षभर विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये सानवी गाडे आणि तनिष दाताळ या विद्यार्थिनींना ‘बेस्ट स्टुडंटऑफ द इयर ’ पुरस्कार प्रदान करून विशेष सन्मानित करण्यात आले.
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांमध्ये मैदानी खेळांविषयी आवड निर्माण व्हावी, यासाठी शाळेच्या वतीने प्रत्येक लहान विद्यार्थ्याला बॅडमिंटन भेट देण्यात आले. हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी शिक्षिका वैष्णवी बारस्कर, कोमल देशमुख, स्नेहल लासुरे, राजश्री देशमुख, अमृता गोसावी तसेच मनीषा वाखूरे आणि छाया भांड यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कलागुणांनी उपस्थित पालक आणि मान्यवर मंत्रमुग्ध झाले.
