• Wed. Apr 1st, 2026

वकील, न्यायालयीन कर्मचारी व कुटुंबीयांना आरोग्य सुरक्षा कवचासाठी महत्त्वपूर्ण बैठक

ByMirror

Mar 31, 2026

आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनांचा संयुक्त लाभ देण्याचा पुढाकार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील वकील, न्यायालयीन कर्मचारी, न्यायाधीश तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुरक्षा कवच मिळावे या उद्देशाने जिल्हा न्यायालयात नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना या योजनांचा संयुक्त लाभ सर्व पात्र घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे.


ही बैठक प्रधान जिल्हा न्यायाधीश शिवाजीराव कचरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आयुष्मान भारत योजनेचे जिल्हा प्रमुख डॉ. अनिकेत भालसिंग, दक्षता अधिकारी व्ही. बी. वांडेकर, टीम लीडर हर्षवर्धन साळवे, पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी तसेच ॲड. अमित थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.


बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, उत्पन्नाची कोणतीही अट न ठेवता न्यायव्यवस्थेशी संबंधित सर्व पात्र घटकांना या योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे १० हजार कुटुंबांना मोफत व कॅशलेस वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे.


अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, या योजनांमुळे गंभीर आजारांवरील उपचार, रुग्णालयीन खर्चासाठी आर्थिक संरक्षण तसेच व्यापक आरोग्य सुरक्षा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेत कार्यरत वकील व कर्मचारी यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


यावेळी ॲड. कारभारी गवळी यांनी या उपक्रमाचे स्वागत करत, “आरोग्य हा हक्क — आता संरक्षणही” या संकल्पनेला बळ देणारा हा निर्णय असल्याचे सांगितले. समाजातील सेवाभावी घटकांसाठी ही योजना आरोग्य सुरक्षा देणारे ऐतिहासिक पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. न्यायव्यवस्थेतील घटकांना केवळ सेवा देण्याची जबाबदारी नसून त्यांच्या आरोग्याचीही खात्री मिळणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
तसेच प्रधान जिल्हा न्यायाधीश शिवाजीराव कचरे यांनी संबंधित लाभार्थ्यांपर्यंत योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *