आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार
पवार यांनी गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवला -आ. संग्राम जगताप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आधार सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच भाजपचे शहर जिल्हा सचिव संदीप पवार यांना “द मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड, दिल्ली” यांच्या वतीने मानद डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंत राठोड, जिल्हा उपाध्यक्ष विजय वडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
संदीप पवार यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ही मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजातील वंचित घटकांना मोठा आधार मिळत असून विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, “संदीप पवार यांनी सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी ‘आधार सामाजिक संस्था’च्या माध्यमातून अनेक गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवला आहे. तसेच राजकीय पदाचा वापर ते समाजकारणासाठी करत असून, अशा व्यक्तींना मिळणारे सन्मान हे संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब आहे. ही मानद डॉक्टर पदवी त्यांच्या कार्याचा सन्मान असून, पुढील काळातही ते अधिक जोमाने समाजकार्यात योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना संदीप पवार म्हणाले की, “मला मिळालेला हा सन्मान माझा नसून, माझ्या सोबत कार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा आणि समाजाचा आहे. समाजातील गरजू लोकांसाठी काम करताना अनेक अडचणी येतात, मात्र लोकांच्या आशीर्वादामुळे आणि सहकार्यामुळेच हे कार्य शक्य झाले आहे. ही मानक डॉक्टर पदवी मला पुढील काळात अधिक जबाबदारीने आणि समर्पणाने काम करण्याची प्रेरणा देणारी आहे. भविष्यातही समाजहिताचे विविध उपक्रम राबवून सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहणार असल्याचे ते म्हणाले. उपस्थितांनी संदीप पवार यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
