प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी
दरवर्षी अपघात, सुविधांचा अभाव; 10-15 लाख भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; भिल्ल समाजाच्या ‘प्रती पंढरपूर’ यात्रेसाठी नियोजनाची गरज
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथे येडूबाई निसर्गगड यात्रेदरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत असल्याचा गंभीर आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने केला आहे. यासंदर्भात समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
दि. 1 एप्रिल ते 5 एप्रिल 2026 या कालावधीत होणाऱ्या या यात्रेसाठी महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, गोवा, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांतून सुमारे 10 ते 15 लाख भाविक मोठ्या श्रद्धेने येतात. भिल्ल समाजाचे दैवत असलेल्या येडूबाई देवीचे हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते. डोंगरावरील स्वयंभू तांदळा स्वरूपातील देवीची स्थापना प्राचीन काळापासून असून ‘नवसाला पावणारी देवी’ म्हणून तिची ख्याती आहे. या यात्रेला ‘भिल्ल समाजाची पंढरी’ किंवा ‘प्रती पंढरपूर’ असेही संबोधले जाते.
यात्रेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने दरवर्षी अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. विशेषतः मुळा नदीत आंघोळ करताना घाट नसल्यामुळे पाय घसरून पडण्याच्या घटना घडतात. या दुर्घटनांमध्ये दरवर्षी एक-दोन भाविकांचा मृत्यू होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच महिलांसाठी स्वतंत्र कपडे बदलण्याची व्यवस्था नसल्याने त्यांना उघड्यावरच कपडे बदलावे लागतात, ही अत्यंत गंभीर बाब आहे.
यात्रेदरम्यान पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नसल्यामुळे भाविकांना नदीचे किंवा शेतीतील पाणी पिण्याची वेळ येते. परिणामी थंडी-ताप, डायरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होतो. केवळ चार टॉयलेट व चार युरीनलची व्यवस्था लाखो भाविकांसाठी अपुरी ठरत आहे. त्यामुळे उघड्यावर शौचास जाण्याची वेळ येत आहे. मोबाईल नेटवर्कची मोठी अडचण असून गर्दीत हरवलेल्या व्यक्तींशी संपर्क साधणे कठीण जाते. तसेच घारगाव फाटा ते येडूबाई गड आणि अकोले मार्गावर खाजगी वाहनांकडून दुप्पट भाडे आकारले जाते. रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात होते.
यात्रेदरम्यान काही ठिकाणी अवैध दारू विक्री होत असल्याने अनेक भाविक त्याच्या आहारी जातात. यामुळे कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाची विशेष पथके नेमण्याची मागणी करण्यात आली आहे.
समितीने प्रशासनाकडे खालील उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यामध्ये वनविभागाची मोकळी जागा यात्रेकरूंना उपलब्ध करून देणे, नदीवर सुरक्षित घाट व महिलांसाठी स्वतंत्र बदल कक्ष उभारणे, फिरते व कायमस्वरूपी टॉयलेटची व्यवस्था, मोबाईल टॉवर व पोलिस मदत केंद्र उभारणे, एनडीआरएफ पथक व स्पीड बोटची नियुक्ती, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी टँकर व्यवस्था, 24 तास फिरते दवाखाने व ॲम्ब्युलन्स सुविध, फायर टेंडर व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवणे, शटल बस सेवा व रस्ते दुपदरीकरण, सीसीटीव्ही व ड्रोनद्वारे निगराणी, अवैध देणगी वसुलीवर नियंत्रण, वरिष्ठ अधिकाऱ्यांची 24 तास उपस्थिती, प्रशासनाकडून तातडीच्या कृतीची मागणी करण्यात आलेली आहे.
लाखो भाविकांची आस्था असलेल्या या यात्रेत सुरक्षितता आणि सुविधा यांचा अभाव गंभीर चिंता निर्माण करणारा आहे. भिल्ल समाजाच्या परंपरा जपत भाविकांना सुरक्षित आणि सुसज्ज वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी संघटनेने केली आहे.
