• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना करिअरची नवी दिशा

ByMirror

Mar 26, 2026
रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना करिअरची नवी दिशा

मासूम संस्थेच्या उपक्रमातून मार्गदर्शन; शिक्षणासोबत उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा


दिवसा कष्ट, रात्री शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले करिअरचे मार्गदर्शन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील नव विद्या प्रसारक मंडळाच्या सरस्वती मंदिर नाईट स्कूलमध्ये मासूम (मुंबई) संस्थेच्या वतीने रात्रशाळेतील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला आजी-माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसभर मेहनत करून रात्री शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या कार्यशाळेच्या माध्यमातून भविष्यासाठी नवी दिशा देण्यात आली.


या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून गजाला शेख आणि अनुराधा पवार यांनी विद्यार्थ्यांना विविध करिअरच्या संधींबाबत सखोल माहिती दिली. आजच्या बदलत्या काळात उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रांतील संधी, त्या मिळवण्यासाठी आवश्‍यक असलेली कौशल्ये, तसेच शिक्षणाच्या विविध वाटा यांचा त्यांनी सविस्तर उहापोह केला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवडी-निवडी आणि क्षमतांचा विचार करून योग्य करिअरची निवड करावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले.


यावेळी मासूम संस्थेचे जिल्हा समन्वयक आशिष सूसरे आणि प्रतिनिधी महेंद्र म्हसे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. करिअर निवडताना केवळ नोकरीच्या संधीच नव्हे, तर स्वतःचा विकास, कौशल्यवृद्धी आणि भविष्यातील बदलत्या संधींचा विचार करणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग गवळी उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या मार्गदर्शन कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढतो आणि त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा मिळते. शिक्षणासोबत योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.
माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष स्वप्नील वाघ आणि उत्तम खैरे यांचीही विशेष उपस्थिती कार्यक्रमाला लाभली. तसेच या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सातळकर, सचिव निलेश वैकर व कार्यकारी मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन देवका लबडे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन वीणा कुऱ्हाडे आणि सुषमा धारूरकर यांनी केले.


या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना करिअरविषयक योग्य दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. विविध कारणांमुळे शिक्षण अर्धवट राहिलेल्या व्यक्तींनी पुन्हा नाईट स्कूलमध्ये प्रवेश घेऊन आपले शिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *